Azam Khan arrested by ED : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मोहम्मद आझम खान यांना तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा अटक करण्यात आली आहे. जौहर विद्यापीठाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने त्यांना रामपूर तुरुंगाबाहेर ताब्यात घेतले.
आझम खान यांच्या सुटकेची माहिती मिळताच, ईडीचे पथकसुमारे ५० सीआरपीएफ जवान आणि १५ वाहनांसह—तुरुंगाच्या ठिकाणी पोहोचले. ईडी आणि सीआरपीएफचे पथक आल्यानंतर, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारीही तिथे दाखल झाले.
अटकेनंतर आझम खान यांना गाडीत बसवताना समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच मोर्चा सांभाळत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आणि कडक बंदोबस्तात ईडीने आझम खान यांना गाडीत बसवून गाझियाबादच्या दिशेने रवाना केले. रविवारी त्यांना गाझियाबाद न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आझम खान यांची सुटका होणार की नाही, याबाबत आधीपासूनच अनिश्चितता होती. एकीकडे जामीन मिळताच दुसरीकडे ईडीने आपल्या हालचाली तीव्र केल्या.
अझीमनगर पोलीस ठाण्यात दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आझम खान यांना ताब्यात वर घेण्यासाठी ईडीने न्यायालयात अर्ज सादर केला होता, यावर सोमवारी (२ नोव्हेंबर) सुनावणी होणार होती. परंतु, त्यापूर्वीच शनिवारी सायंकाळी आझम खान व त्यांचा मुलगा अब्दुल्ला जेलमधून बाहेर पडत असतानाच ईडीने ही कारवाई केली.