राष्ट्रीय

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिरात सुरक्षेचा भंग : मंदिर परिसरात काश्मिरी तरुणाचा नमाज पठणाचा प्रयत्न

पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात, घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Ayodhya Ram Mandir Security Breach

अयोध्या : येथील राम जन्मभूमी मंदिर परिसरात आज (दि. १०) एका काश्मिरी तरुणाने नमाज पठण करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत या तरुणाला ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्‍यान, या प्रकरणी अद्याप अधिकृत अटकेची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच, जिल्हा प्रशासन किंवा 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'कडून या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सुरक्षा रक्षकांनी अडवण्‍याचा प्रयत्‍न केला असता घोषणाबाजी

सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण सकाळी गेट क्रमांक D1 मधून मंदिर परिसरात दाखल झाला होता. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर तो मंदिर संकुलातील 'सीता रसोई' भागाकडे गेला. तेथे दक्षिण परिमिती भिंतीजवळ बसून त्याने प्रार्थनेची (नमाज) तयारी सुरू केली. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने धार्मिक घोषणा देण्यास सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी त्‍याला पकडून तातडीने पोलिसांच्या स्वाधीन केले.

संशयित शोपियान जिल्‍ह्यातील रहिवासी

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव अबू अहमद शेख आहे. तो जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे समजते. घटनेच्या वेळी त्याने पारंपारिक काश्मिरी पोषाख परिधान केला होता. या घटनेची माहिती मिळताच गुप्तचर विभागाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा तरुण कडक सुरक्षा व्यवस्था भेदून आत कसा शिरला, यादृष्टीने तैनात सुरक्षा पथकाचीही चौकशी केली जात आहे.

प्रशासनाकडून अधिकृत अटकेची घोषणा नाही

या प्रकरणातील सूत्रधाराला ताब्यात घेतल्यानंतर, जवळच काश्मिरी कपडे विकणाऱ्या इतर दोन तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांनाही ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत अटकेची घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच, जिल्हा प्रशासन किंवा 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'कडून या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT