अयोध्या : प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या पुन्हा एकदा लाखो दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाली आणि नवा इतिहास रचला. छोटी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रविवारी शरयू नदीच्या काठी 26 लाखांहून अधिक मातीचे दिवे प्रज्वलित करून दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ची नोंद करण्यात आली. या देदीप्यमान सोहळ्यामुळे पवित्र नगरीत दिव्यांचे जणू नभांगणच अवतरले होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ची प्रमाणपत्रे स्वीकारली. उत्तर प्रदेश पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शरयू नदीच्या तीरावर असलेल्या राम की पवडी येथे हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. तब्बल 26 लाख 17 हजार 215 दिव्यांची सर्वात मोठी मांडणी करण्याचा आणि एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी आरती करण्याचा असे दोन विश्वविक्रम यावेळी प्रस्थापित झाले.
या भव्य सोहळ्याने अयोध्येचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा ऐतिहासिक स्तरावर जगासमोर आणला. शरयू नदीच्या किनार्यावर मोठ्या संख्येने भाविक या नेत्रदीपक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी जमले होते. लेझर आणि लाईट शोने राम की पैडीचा परिसर अधिकच प्रकाशमान झाला. त्यामुळे संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध करणारे झाले होते.