लखनौ; वृत्तसंस्था : नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पशुपतिनाथ मंदिर दर्शन करून परतणार्या आंध्र प्रदेशातील यात्रेकरूंच्या बसवर दगडफेक व लूटमारीची घटना घडली. ही घटना 9 सप्टेंबर रोजी भारत-नेपाळ सीमेवरील सोनौलीजवळ घडली. बसचालक राज यांच्या मते, आंदोलकांनी बस थांबवून दगडफेक केली व प्रवाशांकडील वस्तू लुटल्या. या हल्ल्यात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये महिलांचा व वृद्धांचा समावेश आहे.
बसचालक श्यामू निशाद यांनी सांगितले की, नेपाळ आर्मीने तत्काळ मदत केली. त्यानंतर भारत सरकारने सर्व अडकलेल्या यात्रेकरूंना काठमांडूहून दिल्लीला हवाईमार्गे आणण्याची व्यवस्था केली. दरम्यान, नुकसान झालेली बस गुरुवारी उशिरा महाराजगंजजवळील सोनौली सीमेजवळ पोहोचली. यूपीतील सात सीमावर्ती जिल्ह्यांत - महाराजगंज, पिलीभीत, श्रावस्ती, बलरामपूर, बहराईच, सिद्धार्थनगर व लखीमपूर खीरी - सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, नेपाळमधील तुरुंगातून पळून आलेल्या कैद्यांनी भारतात प्रवेश करण्यास सुरुवात केली असून एसएसबीने आतापर्यंत 22 कैद्यांना विविध सीमाबिंदूंवर पकडले आहे.
नेपाळमधील सुरू असलेल्या आंदोलनाने घाझियाबादच्या कुटुंबाची पशुपतिनाथ यात्रेची स्वप्नपूर्ती दुःखात झाली. काठमांडूतील आलिशान हॉटेलला आंदोलकांनी आग लावल्याने राजेश गोला (वय 55) यांचा मृत्यू झाला. रामवीरसिंग गोला पत्नी राजेश यांच्यासह 7 सप्टेंबरला पशुपतिनाथ मंदिराच्या यात्रेसाठी गेले होते.