Raid On Pawan Khera: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीने काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आसाम पोलिसांची टीम पवन खेरांच्या दिल्लीतील घरी पोहचली. दिल्ली पोलीस आसाम पोलिसांना यात मदत करत आहे.
कायद्यानुसार जर एखाद्या राज्याची पोलीस दुसऱ्या राज्यात कारवाईसाठी जाते त्यावेळी स्थानिक पोलिसांना याची कल्पना देणं गरजेचं असतं. त्याअंतर्गत आसाम पोलिसांनी दिल्ली पोलिसांना कळवलं होतं. त्यानंतर राजधानीतील पोलिसांनी आसामच्या टीमला सहकार्य करणं सुरू केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी आसाम पोलीसांची टीम पवन खेरांच्या निवासस्थानावर पोहचली त्यावेळी पवन खेरा घरी नव्हते. पवन खेरा यांनी आसामचे मुख्यमंत्री सरमा यांच्या पत्नीच्या पासपोर्टवरून प्रेस कॉन्फरन्स करून आरोप केले होते त्या प्रकरणात आसाम पोलीस दिल्लीत पोहचले आहेत.
रविवारी आसाममध्ये एक राजकीय वाद निर्माण झाला. काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिनकी सरमी यांच्याकडे तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा आणि परदेशात त्यांची मोठी संपत्ती असल्याचा आरोप केला. यानंतर आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी पलटवार करत हे आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा दावा केला.
सरमा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, 'पवन खेरा यांनी आज प्रेस कॉन्फरन्स करून काँग्रेस पार्टीमधील निराशा आणि भीती दाखवली. आसाम जसजसे ऐतिहासिक जनादेश आणि निर्णायक आघाडीकडे वाटचाल करत आहे तसतसे निराश आणि तथ्यहीन हल्ले केले जात आहेत. यावरून त्यांचा जनाधार घटत आहे हे स्पष्ट होतं.'
याचबरोबर पवन खेरा यांचे आरोप हे वाईट हेतूने, तथ्यहीन आणि राजकारणाने प्रेरित आहेत असे सांगत सरमा यांनी ते आणि त्यांची पत्नी ४८ तासाच्या आत पवन खेरांच्याविरूद्ध गुन्हेगारी आणि दिवाणी मानहानीची केस करणार आहे असं सांगितलं. तसेच त्यांनी पवन खेरा यांना त्यांच्या वक्तव्यासाठी जबाबदार धरलं जाईल असं देखील सांगितलं.