Assam Congress President Gaurav Gogoi
नवी दिल्ली : आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी खासदार गौरव गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सोबतीला ३ कार्याध्यक्षांसह ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षही नियुक्त करण्यात आले.
पुढच्या वर्षी आसाम विधानसभेची निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीपूर्वीच आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हेमंता विश्वा शर्मा आणि गौरव गोगोई यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले. या पार्श्वभूमीवर गौरव गोगोई यांची आसाम प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होईल, अशा चर्चा काँग्रेसच्या गोटात होत्या. त्यानुसार गौरव गोगोई यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
गौरव गोगोई हे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत तसेच लोकसभेत काँग्रेसचे उपनेते आहेत. गौरव गोगोई यांच्यासह झाकीर हुसेन सिकदर, रोझेलीना तिरकी, प्रदीप सरकार यांची प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सोबतच प्रचार समितीच्या अध्यक्षपदी भूपेन कुमार बोरा, संयोजन समिती अध्यक्षपदी देवाव्रता सैकीय, जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी प्रद्युत बोरदोलोई आणि प्रचार समितीच्या अध्यक्षपदी रकीबुल हुसेन यांची निवड करण्यात आली.
आसाममध्ये भाजपचे हेमंता विश्वा शर्मा तर काँग्रेसचे गौरव गोगोई यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाक् युद्ध सुरू आहे, या पार्श्वभूमीवर गौरव गोगोई प्रदेशाध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा होत्या. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी नियुक्त केलेले प्रदेशाध्यक्ष म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे आसाममध्ये गौरव गोगोई काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार मानले जातात.