Railway Minister Ashwini Vaishnaw  file photo
राष्ट्रीय

Ashwini Vaishnaw : मुंबईसाठी तयार होत आहेत 238 नव्या बंद दार लोकल!

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव; मुंबई लोकल नेटवर्कच्या विस्तारावरही भर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सुरू असलेल्या कामांची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे 238 नवीन लोकल गाड्या तयार करत आहोत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. या गाड्यांना स्वयंचलित दरवाजे असतील. यासोबतच स्थानकांच्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे वैष्णव म्हणाले.

स्थानकनिहाय होत असलेले बदल

वांद्रे टर्मिनस : 3 नवीन पिट लाईन्सची निर्मिती, मुंबई सेंट्रल : प्लॅटफॉर्मचा विस्तार, जोगेश्वरी : 2 अतिरिक्त प्लॅटफॉर्म, दादर : 1 नवीन प्लॅटफॉर्म, वसई रोड : 6 नवीन प्लॅटफॉर्म, 3 पिट लाईन्स आणि 5 स्टेबलिंग लाईन्स, पनवेल-कळंबोली : 5 प्लॅटफॉर्म, 4 पिट लाईन्स आणि 2 सिक लाईन्स, कल्याण : 6 प्लॅटफॉर्म आणि 4 पिट लाईन्स, लोकमान्य टिळक टर्मिनस : प्लॅटफॉर्म विस्तार, 3 पिट लाईन्स आणि 2 सिक लाईन्स, परेल : 6 प्लॅटफॉर्म, 5 पिट लाईन्स आणि 6 स्टेबलिंग लाईन्स, याशिवाय विरारमध्ये 25, डहाणू रोडमध्ये 11 आणि मीरा रोडमध्ये 25 स्टेबलिंग लाईन्सचे काम सुरू आहे. 15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी 34 स्थानकांचा विस्तार केला जात आहे. मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्टच्या विविध टप्प्यांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद 16 हजार कोटींवरून वाढवून 33 हजार कोटी रुपये करण्यात आली आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.

डहाणू-नाशिक आणि कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग

डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पश्चिम घाटाच्या कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे हा प्रकल्प आव्हानात्मक आहे. तसेच, कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग हा भिवंडी आणि कल्याण क्षेत्रासाठी लाईफलाईन ठरू शकतो. या प्रकल्पाची मूळ किंमत 836 कोटी रुपये होती; परंतु भूसंपादनामुळे जमिनीची किंमत साधारणतः 1,400 कोटी रुपये इतकी वाढली आहे. तरीही रेल्वे भूसंपादन पूर्ण करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

कोकण मार्ग होणार दुहेरी

कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी करण्याच्या दिशेने रेल्वे मंत्रालय वेगाने काम करत असून, सध्या याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. मात्र, हा प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी संबंधित चारही राज्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे, अशी अपेक्षा वैष्णव यांनी व्यक् त केली. शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांनी विचारलेल्या पूरक प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही चार राज्ये भागधारक आहेत. महाराष्ट्र आणि गोवा सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे; परंतु कर्नाटक आणि केरळकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने प्रकल्पात काही अडचणी येत आहेत. रेल्वेमंत्र्यांनी या दोन्ही राज्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT