राष्ट्रीय

Arvind Sawant | ‘ माझा गळा चिरला तरी पक्ष बदलणार नाही’ : मूळ शिवसेनेसोबत प्रतारणा म्हणजे दूध पाजणाऱ्या आईशी प्रतारणा - अरविंद सावंत!

शिंदे गटासोबत भेटीगाठींच्या चर्चेमुळे सावंत यांची संतप्त प्रतिक्रीया!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : “माझा गळा चिरला तरी मी पक्ष बदलणार नाही. मूळ शिवसेनेसोबत प्रतारणा म्हणजे म्हणजे दूध पाजणाऱ्या आईशी प्रतारणा आहे,” अशा तीव्र शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला. ऑपरेशन लोटस, शिंदे गटासोबत भेटीगाठी असा कुठलाही प्रकार घडला नाही. काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बैठकीच्या बातम्या धादांत खोटी आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार आहे, असेही ते म्हणाले. 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ऑपरेशन टायगर होईल, अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये ऑपरेशन टायगर संदर्भात खासदारांची एक बैठक पार पडल्याचे वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एका इंग्रजी वृत्तपत्रात खासदारांची बैठक झाली असा दावा केला. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. माझे सर्व मोबाईल तपासा असे आव्हान त्यांनी दिले सोबतच संबंधित वर्तमानपत्राने काही नावांचा उल्लेख टाळल्याचाही त्यांनी आरोप केला.

अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंच्या एका फोनवर मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. माझी निष्ठा मी कधीच बदलणार नाही. आमची विकली जाणारी औलाद नाही. जर बैठक झाली असेल, तर त्याचे पुरावे आणि फोटो प्रसिद्ध करावेत, असे आव्हान त्यांनी दिले. दरम्यान, २४ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वी अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक प्रसिद्ध केल्या जातात. यावेळी अरविंद सावंत यांनी माध्यमांवरही आगपाखड केली. पत्रकारांनी स्वतःला न्यायालय समजू नये, असेही ते म्हणाले.

पक्ष सोडणार नाही... सावंतांनी लिहून दिले

पत्रकारांकडून विविध प्रश्न विचारले जात असताना अरविंद सावंत यांनी लिहून दिले की, मी पक्ष सोडणार नाही. संतप्त अरविंद सावंत यांनी तातडीने कागद पेन घेतला. यावर त्यांनी लिहिले की, मी आज जाहीरपणे लिहून देतो की, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक असून मला उभा चिरला तरी पक्षाशी आणि मातोश्रीशी असलेले नाते कधीही तोडणार नाही. माझा पक्ष खरंतर मूळ शिवसेना पक्षासोबत प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे, असे मी समजतो. खोटी बातमी छापली त्याचा तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालंट लावले म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करणार आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT