Bat Deaths Heatwave | कडक उन्हामुळे पाचशे वटवाघळांचा मृत्यू! 
राष्ट्रीय

Bat Deaths Heatwave | कडक उन्हामुळे पाचशे वटवाघळांचा मृत्यू!

गडचिरोलीतील घटना; जंगलातून दुर्गंधी आल्यानंतर प्रकार उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : अवघा महाराष्ट्र तळपत्या उन्हामुळे होरपळलेला असताना असह्य उकाड्याने गडचिरोलीत तब्बल पाचशे वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जंगलातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा मृत्यू होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी, असा कयास वन विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात उकाडा चांगलाच वाढला आहे. तीव्र उष्णता, 46 डिग्रीपर्यंतचे तापमान यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चंद्रपूर, यवतमाळसह गडचिरोलीत तर उन्हामुळे दिवसा संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागातील परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून चिंचेच्या झाडांवर वटवाघळांचा जथ्थाच मुक्कामी असतो. जिल्ह्यात पहिल्यांदाच वटवाघळांना तापमानवाढीचा फटका बसला आहे. एवढे मोठे तापमान आणि उष्णता सहन न झाल्याने चिंचेच्या झाडावरील एकाच वेळी 500 पेक्षा अधिक वटवाघळे मृत झाली आहेत.

दुपारी बाहेर न पडण्याचे आवाहन

सध्या गडचिरोली जिल्ह्यातील तापमान 46 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले आहे. महत्त्वाचे काम असेल तरच चेहरा झाकून घराबाहेर पडावे व आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

झाडावरच लोंबकळत्या अवस्थेत मृत्यू

वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक जंगलातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर लोकांनी तिथे जाऊन पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. झाडाच्या बुंध्यापाशी अनेक वटवाघळे मृतावस्थेत पडलेली आढळून आली. यातील काही वटवाघळेे झाडावरच लोंबकळलेल्या अवस्थेत मृत झाल्याचे दिसून आले. त्यानंतर काही गावकर्‍यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून या सर्व मृत वटवाघळांना पुरले, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT