जयपूर; वृत्तसंस्था : पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरून फोफावलेला सरकार पुरस्कृत दहशतवाद त्वरित थांबवावा, अन्यथा जगाच्या इतिहासातून आणि नकाशावरून पाकचे अस्तित्व कायमचे पुसून टाकू, असा अत्यंत गर्भित इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे.
राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे लष्करी जवानाना संबोधित करताना जनरल द्विवेदी यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर 1.0’मध्ये भारताने घेतलेल्या निर्णायक कारवाईचा संदर्भ देत पुन्हा डिवचल्यास भारत कोणत्याही प्रकारे संयम दाखवणार नाही, असे स्पष्ट केले. पाकला दम भरताना जनरल द्विवेदी म्हणाले, जर पाकिस्तानला जागतिक इतिहास आणि भूगोलात आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांनी सरकार पुरस्कृत दहशतवाद थांबवला पाहिजे. ‘ऑपरेशन सिंदूर 1.0’ दरम्यान आम्ही जसा संयम दाखवला, तसा तो यापुढे दाखवला जाणार नाही आणि जर पुन्हा भारताला डिवचले तर आम्ही एक पाऊल पुढे जाऊ. भविष्यातील कारवाई इतकी कठोर असेल की, पाकिस्तानला ‘इतिहास आणि भूगोलात स्थान हवे की नाही’ याचा पुन्हा विचार करावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानच्या अंतर्गत भागातील नऊ दहशतवादी तळ आणि लाँचपॅडवर अचूक हल्ले केले होते. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.
लष्करप्रमुखांनी भारतीय जवानांना पूर्णपणे तयार राहण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, पूर्ण तयारी ठेवा. देवाची कृपा झाली तर तुम्हाला लवकरच दुसरी संधी मिळेल. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने केवळ दहशतवादी तळ, प्रशिक्षण केंद्रे आणि त्यांच्या सूत्रधारांना लक्ष्य केले. कोणताही निष्पाप नागरिक किंवा लष्करी ठिकाण उद्ध्वस्त झाले नाही याची खात्री केली, असे जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केले. तसेच नष्ट झालेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांचे पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सादर करून पाकिस्तानला या कारवाईचा परिणाम लपवण्यापासून रोखले, असेही त्यांनी सांगितले. मे महिन्याच्या हल्ल्यांमुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते. मात्र 10 मे रोजी पाकिस्तानने गुडघे टेकल्यानंतर युद्धविराम घोषित करण्यात आला.