पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील संभलमधील चंदौसी येथे प्रशासनाकडून जमिनीच्या उत्खननावेळी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. येथील शिव-हनुमान मंदिर ४६ वर्षांनंतर पुन्हा उघडल्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला शनिवारी (दि. २१) उत्खननादरम्यान एक पायरी विहीर सापडली. ती सुमारे १५० वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथे एक तळघर असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. ही विहीर अतिक्रमणमुक्त करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शनिवारी (दि.२१ डिसेंबर) महसूल विभागाने चांदौसी येथील जमिनीचे उत्खनन केले असता, त्याखाली एक विहीर आढळून आली. चंदौसीचा लक्ष्मणगंज परिसर १८५७ पूर्वी हिंदूबहुल होता. येथे सैनी समाजाचे लोक राहत होते.संभलमध्ये 46 वर्षे जुने मंदिर सापडल्यानंतर जिल्हाधिकार्यांना तक्रार पत्र देण्यात आले होते. यामध्ये लक्ष्मण गंज परिसरात बिलारीच्या राणीची पायरी विहीर असल्याचे म्हटले होते. यानंतर जिल्हाधिकार्यांनी चौकशीचे आदेश दिले. शनिवारी महसूल विभागातील नायब तहसीलदार धीरेंद्र सिंह परिसराचा नकाशा घेऊन तेथे पोहोचले होते. जमीन उत्खनावेळी मध्यभागी खोदकाम केल्यावर प्राचीन विहीर असल्याचे निदर्शनास आले.
संभलमधील अधिकार्यांनी स्पष्ट केले की, खोदकाम सुरू असताना दुमजली इमारत दिसली. विहीर आणि तलावाची नोंदही नोंदींमध्ये आहे. येथे एक बोगदाही निघू शकतो. दरम्यान, भारतीय पुरातत्व विभागाच्या (एएसआय) पथकाने शनिवारी संभलमधील कल्की मंदिराला पाहणी केली. तसेच या पथकाने शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षण केले. यामध्ये १९ विहिरी आणि ५ तीर्थक्षेत्रांचा समावेश होता. एएसआयच्या पथकाने संभलच्या कल्की मंदिरात असलेल्या प्राचीन कृष्ण विहिरीचे सर्वेक्षण केले. याशिवाय मंदिराच्या पुजाऱ्यासोबत मंदिराच्या आतही सर्वेक्षण करण्यात आले. मंदिराच्या आत बांधलेल्या घुमटाचा फोटोही पथकाने टिपले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक प्रशासनाकडून गुप्तपणे हे सर्वेक्षण करण्यात आले.