राष्ट्रीय

PM Narendra Modi | पश्चिम आशियातील शांततेसाठी अरब राष्ट्रांची भूमिका कौतुकास्पद

अरब राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी भेट

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; पीटीआय : अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अरब राष्ट्रांनी बजावलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. दुसर्‍या भारत-अरब परराष्ट्रमंत्री बैठकीसाठी अरब राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री सध्या नवी दिल्लीच्या दौर्‍यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

* भारत आणि अरब राष्ट्रांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी

* या बैठकीमुळे ऊर्जा पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्यास मदत

* सौदी अरेबिया आणि यूएईकडून भारतातील पायाभूत सुविधा आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत.

* आरोग्य सेवा आणि डिजिटल तंत्रज्ञानात परस्पर सहकार्य

* अरब राष्ट्रांच्या व्यासपीठावर पॅलेस्टाईनचा उल्लेख हे भारताच्या संतुलित मुत्सद्देगिरीचे प्रतीक

ऐतिहासिक संबंधांवर भर

पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भारत आणि अरब जगतातील खोलवर रुजलेले ऐतिहासिक आणि जनसामान्यांमधील संबंधांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. हे संबंध वर्षानुवर्षे दोन्ही बाजूंमधील नाते अधिक द़ृढ करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.’

सहकार्याचे नवीन व्हिजन

पंतप्रधानांनी भारत-अरब भागीदारीसाठी भविष्यातील आपला द़ृष्टिकोन मांडला. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये दोन्ही बाजूंच्या लोकांच्या परस्पर फायद्यासाठी सहकार्य अधिक वाढवण्याबाबत त्यांनी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

पॅलेस्टाईनला पाठिंबा

या बैठकीत मोदींनी पॅलेस्टिनी जनतेला भारताचा पाठिंबा कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच, गाझा शांतता आराखड्यासह (गाझा पिस प्लॅन) शांततेसाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले. प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी अरब लीगने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दलही पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT