महाराष्ट्रातील १३ साखर कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावास मंजुरी Pudhari File Photo
राष्ट्रीय

राज्यातील १३ साखर कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावास मंजुरी

राष्ट्रीय सहकार मंत्रालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा
प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १३ साखर कारखान्यांच्या १ हजार ८९८ कोटींच्या कर्ज प्रस्तावास राष्ट्रीय सहकार मंत्रालयाने मंजुरी दिली. या प्रस्तावास केंद्रीय सहकार विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय सहकार विकास निगमने मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर सदरील कर्ज प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे आला होता, त्यास निगमच्या संचालक मंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन दिली. यामध्ये भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ७ आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित असलेल्या आमदाराचा आहे.

लोकसभा निवडणुकीत साखर पट्यात झालेल्या दारुण पराभवानंतर सत्ताधारी महायुतीमधील साखर कारखानदारांची नाराजी दूर करण्यासाठी तब्बल १८९८ कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव केंद्राकडे ठेवला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमने १३ कारखान्यांना कर्ज मंजूर केले. गळीत हंगामापूर्वी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक साखर कारखान्यांनी सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या (मार्जीन मनी) मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या कारखान्यांचे प्रस्ताव फेटाळून केवळ महायुतीशी सबंधित १३ कारखान्यांचे प्रस्ताव मान्य केले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे कर्ज प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठविण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत याचे राजकारण होईल आणि त्याचा फटका बसेल. तसेच स्वपक्षातील काही कारखानदार नाराज होतील, हे लक्षात घेऊन केंद्राने गेले ३ महिने या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यावर आता निर्णय घेऊन या १३ कारखान्यांना कर्ज मंजूरी करण्यात आली आहे.

सरकारने कर्जमंजुरी दिलेल्या कारखान्यांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांचे कारखाने

  • लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) १०४ कोटी,

    किसनवीर (सातारा)३५० कोटी, किसनवीर (खंडाळा) १५० कोटी

  • लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना (नेवासा) १५० कोटी

  • अगस्ती (अहमदनगर) १०० कोटी

  • अंबाजोगाई (बीड) ८० कोटी

  • शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ११० कोटी

भाजपच्या गटातील आमदारांचे कारखाने

  • संत दामाजी (मंगळवेढा)१०० कोटी

  • वृद्धेश्वर (पाथर्डी)९९ कोटी

  • सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे ( कोपरगाव) १२५ कोटी

  • तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) ३५० कोटी

  • बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) १०० कोटी

काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) ८० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT