नवी दिल्ली : रेल्वेमध्ये ग्रुप- डी वर्ग १ अंतर्गत ३२ हजार ४३८ पदांची भरती सुरु आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी आहे. तर २४ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थी अर्जाची शुल्क भरु शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यासाठी आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
या भरतीमध्ये असिस्टंट ब्रिज, असिस्टंट लोको शेड (डिझेल), ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट सी अँड डब्ल्यू, असिस्टंट डेपो (स्टोअर्स), केबिन मॅन, पॉइंट्समन आणि इतर अनेक पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना प्रत्येक रिक्त पदांसाठी तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेने जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहायला आरआरबीने सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना या पदांसाठी संगणक आधारित चाचणी (सीबीटी), शारीरिक कार्यक्षमता चाचण्या (पीईटी), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा चार टप्प्यांच्या निवड प्रक्रियेतून जावे लागेल.
या भरतीसाठी अर्ज सादर करायचा असल्यास, विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३६ वर्षे असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ साथीच्या आजारामुळे पूर्वी भरतीच्या संधी गमावल्या असतील त्यांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. भरती संबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आरआरबीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.