Bangladesh Protests Updates
बांगलादेश आरक्षणविरोधी आंदोलन भडकलं; हिंसाचारात ३९ विद्यार्थ्यी ठार File Photo
राष्ट्रीय

Bangladesh protests | बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलन भडकलं; हिंसाचारात ३९ विद्यार्थी ठार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपादरम्यान गुरुवारी उसळलेल्या हिंसक घटनांमध्ये ३९ विद्यार्थी ठार झालेत. तर २५०० हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. बांगलादेशात दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, त्याला हिंसक वळण लागले आहे.

ढाका येथे काठ्या आणि दगडांनी सज्ज हजारो विद्यार्थ्यांची सशस्त्र पोलिस दलांशी चकमक झाली. चितगावमध्ये महामार्ग रोखणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दूरसंचार आणि इंटरनेट सेवांमध्ये मोठा व्यत्यय

बांगलादेशमध्ये नागरी सेवा भरतीच्या नियमांविरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली. येथील पोलीस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात किमान ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनात अनेक सरकारी इमारती जाळण्यात आल्या आहेत. संघर्षांमुळे मोठ्या प्रमाणावर दूरसंचार व्यत्यय निर्माण झाला आहे, अनेक परदेशातील कॉल कनेक्ट करण्यात अयशस्वी झाले आहेत. स्थानिक इंटरनेट सेवांवर देखील गंभीर परिणाम झाला आहे.

लष्कराचे जवान तैनात

परिस्थिती पाहता बॉर्डर गार्ड बांगलादेशचे सैनिक देशभरात तैनात करण्यात आले आहेत. खासगी सोमय टेलिव्हिजन वाहिनीने सांगितले की, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी रबर बुलेट, अश्रुधुर आणि ध्वनी ग्रेनेडचा वापर सुरूच ठेवला. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत, असेही माध्यमांनी स्पष्ट केले आहे.

बांगलादेशात 'अशी' आहे आरक्षण व्यवस्था

  • स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण मिळते.

  • बांगलादेशात महिलांसाठी 10 टक्के आरक्षणाची तरतूद आहे.

  • याशिवाय विविध जिल्ह्यांसाठी 10 टक्के आरक्षण निश्चित आहे.

  • संथाल, पांखो, त्रिपुरी, चकमा आणि खासी या जातीय अल्पसंख्याकांसाठी 6% कोटा आहे. हिंदूंसाठी वेगळे आरक्षण नाही.

  • ही सर्व आरक्षणे एकत्र जोडल्यास 56% आहे. याशिवाय उर्वरित ४४ टक्के गुणवत्तेसाठी ठेवण्यात आले आहेत.

SCROLL FOR NEXT