नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार कोयल मलिक यांनी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मलिक यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षत्यागाची मालिका आणखी तीव्र झाल्याचे मानले जात आहे. बुधवारी मदन मित्रा यांनीही पक्षाचा राजीनामा देत रितब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात प्रवेश केला होता. विशेष म्हणजे, तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश न देण्याची पूर्वीची भूमिका बदलत भाजपने या माजी तृणमूल नेत्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.