Annual income
हिंदूंचे वार्षिक उत्पन्न 19 टक्क्यांनी वाढले आहे. Pudhari File Photo
राष्ट्रीय

हिंदूंचे वार्षिक उत्पन्न 19 टक्के, शिखांचे 57 टक्के वाढले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कंझ्युमर इकॉनॉमी (प्राईस) या संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सात वर्षांत देशातील मुस्लिमांचे वार्षिक उत्पन्न 28 टक्के, तर हिंदूंचे वार्षिक उत्पन्न 19 टक्क्यांनी वाढले आहे. शिखांच्या वार्षिक उत्पन्नात सर्वाधिक 57 टक्क्यांची वाढ झाली आहे.

गेल्या सात वर्षांत हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांतील उत्पन्नाचे अंतर वेगाने कमी होत आहे. दोन्ही समुदायांतील वार्षिक उत्पन्नात पूर्वी मोठा फरक होता. तो गेल्या 7 वर्षांत 87 टक्क्यांनी कमी झाला आहे. 2016 मध्ये दोन्हींच्या दरमहा उत्पन्नात 1,917 रुपयांचा फरक होता. अर्थात मुस्लिम कुटुंबांचे उत्पन्न एवढ्या रकमेने कमी होते, पण हा फरक आता केवळ दरमहा 250 रुपये उरलेला आहे.

देशातील 165 जिल्ह्यांतील 1,944 गावांमधील 2,01,900 कुटुंबांमध्ये हे हे नमुना सर्वेक्षण झाले. गत 7 वर्षांत मुस्लिम कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.73 लाख रुपयांवरून 3.49 लाख रुपये झाले आहे. 27.7 टक्क्यांनी म्हणजेच जवळपास 28 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. या कालावधीत हिंदू कुटुंबांच्या उत्पन्नात 2.96 लाख रुपयांवरून 18.8 टक्क्यांनी वाढ होऊन ते 3.52 लाख रुपये झाले आहे.

कोरोनापूर्वी, देशाच्या उत्पन्नातील अल्प उत्पन्न गटाच्या 20 टक्के लोकांचा वाटा 3 टक्के होता. 2022-23 मध्ये त्यांचा हा वाटा वाढलेला असून तो 6.5 टक्के झाला आहे. अधिक उत्पन्न गटाच्या 20 टक्के लोकांचा देशाच्या उत्पन्नातील वाटा 52 टक्क्यांवरून 45 टक्के झालेला आहे. गोरगरिबांचे उत्पन्न वाढल्याचेच ते द्योतक आहे. सरकारच्या मोफत धान्य योजना, किसान सन्मान निधी आणि गृहनिर्माण योजनांनीही सामाजिक-आर्थिक दरी कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली.

अशी झाली उत्पन्नात वाढ

* 2016 मध्ये हिंदू कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न 24,667 रुपये होते आणि मुस्लिमांचे 22,750 रुपये होते. 2023 मध्ये हिंदूंचे मासिक उत्पन्न 29,333 रुपये; तर मुस्लिमांचे 29,083 रुपये झालेले आहे.

* देशातील 60 लाख शीख कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात 57.4 टक्क्यांनी (4.40 लाखांवरून 6.93 लाखांपर्यंत) वाढ झाली आहे.

* जैन-पारशी आणि इतर लहान समुदायांचे वार्षिक उत्पन्न 53.2 टक्क्यांनी वाढले. 3.64 लाख रुपयांवरून ते 5.57 लाख झाले आहे.

SCROLL FOR NEXT