राष्ट्रीय

आंध्रच्या पुरंदेश्वरी होणार लोकसभेच्या अध्यक्ष?

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तेलगू देसमने गळा काढू नये म्हणून भाजपकडून या पदासाठी आंध्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षा दग्गुबाती पुरंदेश्वरी यांचे नाव पुढे आणण्याची खेळी भाजपकडून केली जात आहे.

मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण खाती स्वत:कडे राखल्यानंतर भाजपला हे पदही आपल्याकडेच हवे आहे. अनेक तांत्रिक कारणे अर्थातच त्यामागे आहेत. दुसरीकडे आघाडीतील तेलगू देसम तसेच जदयु या दोन्ही पक्षांचाही या पदावर डोळा आहे. तेलगू देसम हा भाजपनंतर आघाडीतील सर्वांत मोठा घटक पक्ष आहे. भाजपच्या अन्य कुणा नेत्याला हे पद दिले तर या दोन्ही घटक पक्षांच्या डोळ्यात ते खुपेल. किमान तेलगू देसमला या बोचणीतून वजा करावे म्हणून पुरंदेश्वरी यांचे नाव पुढे येत आहे. पुरंदेश्वरी या भाजप नेत्या तर आहेतच, त्या तेलगू देसमचे संस्थापक नेते तसेच अभिनेते एन. टी. रामा राव यांच्या कन्याही आहेत. अर्थातच चंद्राबाबू नायडूंच्या मेहुणीही आहेत. त्या राजमुंदरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. पुरंदेश्वरी यांचे नाव पुढे केल्यास त्यामुळे किमान तेलगू देसममधून विरोध होणार नाही, याचा ठाम विश्वास भाजपला आहे.

माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेही नाव चर्चेत आहे. कारण ओम बिर्ला यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झालेली नाही.

SCROLL FOR NEXT