Andhra stampede case :
श्रीकाकुलम : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात शनिवारी (दि.१) वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल सर्वसामान्यांकडून केला जात असतानाच याबाबत ज्यांनी मंदिर उभारले त्या ९४ वर्षीय हरी मुकुंदा पांडा यांनी धक्कादायक विधान केले आहे.
पांडा यांनी 'एनडीटीव्ही'ला सांगितले की त्यांनी एकादशी कार्यक्रमाबद्दल स्थानिक प्रशासनाला माहिती दिली नव्हती. "मी माझ्या खाजगी जमिनीवर मंदिर बांधले. मी पोलिसांना किंवा प्रशासनाला माहिती का द्यावी?" त्यांनी विचारले. तसेच कितीही गुन्हे दाखल करा. मला काही अडचणी नाही, असे आव्हानही त्यांनी प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, पांडा यांनी पोलिसांना आधीच माहिती दिली असती तर गर्दीचे व्यवस्थापन करण्याची व्यवस्था करू शकले असते. त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
तिरुपती मंदिराची प्रतिकृती असलेल्या श्रीकाकुलम येथील वेंकटेश्वर मंदिराला स्थानिक लोक ''मिनी तिरुपती' म्हणून ओळखतात. एकादशीच्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्यावेळी मंदिराचे बांधकाम अजूनही सुरूच होते. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार नुसार, या दुर्घटनेनंतर पांडा म्हणाले, "याला कोणीही जबाबदार नाही, ही देवाची करणी होती." चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी पांडा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक माध्यमांशी बोलताना पांडा म्हणाले, "रोज भक्त दर्शनासाठी येतात आणि निघून जातात. आज देखील तसेच होईल असे मला वाटले होते. अचानक, खूप मोठी गर्दी आली. त्यांनी दरवाजे ढकलले आणि आत घुसले. रोज ३ ते ४ हजार भक्त मंदिरात येतात आणि आरामात दर्शन घेऊन जातात. सर्वजण रांगेत उभारुन दर्शन घेतात. , प्रसाद घेतात, खातात आणि निघून जातात. आज तसे झाले नाही. एकाच वेळी मोठी गर्दी आली. हे सर्व लोक कुठून आले, हे मला माहीत नाही. दररोज ४,००० भक्त येतात, मी एकटाच त्यांची व्यवस्था सांभाळतो. मी सर्वांना काळजीपूर्वक जाण्यास सांगायचो. आज मात्र प्रचंड गर्दी जमली. पोलिसांनी त्यांना सांगितले नाही, कोणीही सांगितले नाही. लोक एकदम आले."
पांडा एकदा तिरुपतीला दर्शनाला गेले होते. यावेळी त्यांना त्रास झाला. यानंतर त्यांनी श्रीकाकुलम येथे वेंकटेश्वर मंदिर उभारण्याचा निर्धारय केला. यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च केल्याचे वृत्त आहे. आता मंदिरात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर तुम्ही कितीही गुन्हे दाखल करू शकता. मला काही अडचण नाही," असे आव्हानाच त्यांनी प्रशासनाला दिले आहे.