Naxalites killed
विजयवाडा : नक्षल्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य माडवी हिडमा याला कंठस्नान घातल्यानंतर आज पुन्हा आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात मोठी मोहीम यशस्वी केली आहे. अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेडुमिलीच्या घनदाट जंगल परिसरात झालेल्या दुसऱ्या एका चकमकीत सात माओवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या मृतांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
आध्र प्रदेश इंटेलिजन्सचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश चंद्र लड्ढा यांनी विजयवाडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, बुधवारी झालेला गोळीबार हा मंगळवारी झालेल्या कारवाईचाच पुढील भाग होता. आतापर्यंत सात माओवादी ठार झाले आहेत," असे ते म्हणाले.
लड्ढा यांनी पुढे सांगितले की, हिडमा मारला गेल्यानंतर सुरक्षा दलांनी गोळा केलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, NTR, कृष्णा, काकीनाडा, कोनासीमा आणि एलुरु या जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी एकाच वेळी ५० माओवाद्यांना अटक केली आहे. आंध्र प्रदेशच्या इतिहासातील माओवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी अटक मोहीम असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी माओवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामध्ये ४५ शस्त्रे, २७२ गोळ्या, दोन मॅगझिन, ७५० ग्रॅम वायर आणि इतर महत्त्वाचे साहित्य यांचा समावेश आहे.