Markapuram Accident | आंध्र प्रदेशमध्ये बस-डंपर धडकेत 13 जिवंत जळाले File Photo
राष्ट्रीय

Markapuram Accident | आंध्र प्रदेशमध्ये बस-डंपर धडकेत 13 जिवंत जळाले; 22 गंभीर जखमी

मार्कापूरमजवळ भीषण दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

अमरावती; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील मार्कापूरम जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. खासगी ट्रॅव्हल्सची बस आणि डंपर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत बसला तत्काळ आग लागली. या दुर्घटनेत 13 प्रवासी जिवंत जळून मृत्युमुखी पडले, तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिकृष्णा ट्रॅव्हल्सची बस तेलंगणातील निर्मल येथून नेल्लोरकडे जात होती. सकाळी सुमारे 6 वाजता रायवरमजवळ बस आणि गिट्टीने भरलेल्या डंपरमध्ये समोरासमोर धडक झाली. धडक होताच बसला भीषण आग लागली आणि प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

मार्कापूरमचे पोलिस अधीक्षक वी. हर्षवर्धन राजू यांनी सांगितले की, डंपर चालकासह सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातावेळी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, डंपरमध्ये रस्ते बांधकामात वापरण्यात येणारे छोटे दगड भरलेले होते आणि दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात घडला. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

तीन तासांनी आगीवर नियंत्रण

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने सुमारे तीन तासांनंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. या दरम्यान बस पूर्णपणे जळून खाक झाली.

पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा

राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.

SCROLL FOR NEXT