Anant Singh Daughter Wedding बिहारमधील मोकामा येथील लदमा गाव सध्या एखाद्या चित्रपटाच्या भव्य सेटपेक्षा कमी दिसत नाहीये. आपल्या शाही विवाहसोहळ्याच्या तयारीमुळे हे गाव संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. याचे कारण म्हणजे बाहुबली आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी सिंह हिचा विवाह. हा विवाहसोहळा २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याची भव्यता इतकी आहे की देशातील सोशल मिडीयावर याचीच चर्चा सुरु आहे. अनेक माध्यमांनीही याची दखल घेतली आहे.
या लग्नाला तब्बल ४ लाख पाहुणे उपस्थित राहू शकतात, असा दावा केला जात आहे. तसेच अनंतसिंह हे २०२५ मधील दुलारचंद यादव यांच्या हत्या प्रकरणात अनंत सिंह मुख्य आरोपी असून १ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना अटक करून पाटण्याच्या बेऊर तुरुंगात पाठवण्यात आले होते. तर परवानगी म्हणून लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. लग्नानंतर ४ डिसेंबर २०२६ रोजी ते पुन्हा कारागृहात जातील.
ताजमहाल आणि लाल किल्ल्याची प्रतिकृती: या लग्नाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील सजावट. लदमा गावातील सुमारे १० एकर जमिनीवर भव्य शामियाना उभारण्यात आला असून, लग्नाचा मुख्य मंडप आणि प्रवेशद्वार ताजमहाल आणि लाल किल्ल्याच्या धर्तीवर सजवले जात आहेत. संपूर्ण परिसराला राजवाड्याचे स्वरूप दिले जात आहे.
१५० हून अधिक प्रकारची पक्वाने
पाहूण्यांच्या सरबराईमध्ये कोणतिही कमी पडू नये यासाठी खास व्यवस्था केली आहे. लग्नात जेवणामध्ये जवळपास १५० हून अधिक प्रकारची पक्वाने असणार आहेत. चार लाख पाहुण्यांसाठी हे पदार्थ तयार करण्यावर जवळपास ३० ते ३५ कोटी रुपयांपर्यंत खर्च येण्याचा अंदाज आहे. पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या गाड्या आणि इतर भेटवस्तूंवर सुमारे ५ कोटी रुपये खर्च होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. या संपूर्ण सोहळ्यावर आणि भेटवस्तूंवर सुमारे ५० कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
४ लाख पाहुण्यांना निमंत्रण
लग्नात अनेक व्हिआयपी पाहुणे येणार असून त्यांच्यासाठी हेलिपॅडचीही सुविधा केली आहे. मोकामा आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक घराला या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे. या लग्नासाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर पाकिस्तानातूनही काही पाहुणे येणार असून त्यांच्या राहण्याची आणि पाहुणचाराची विशेष सोय केली जात आहे. या सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे आमदार-खासदार, उच्चपदस्थ अधिकारी आणि उद्योगपती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अनंतसिंह यांची १०० कोटी रुपयांहून अधिक कौटुंबिक संपत्ती
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, अनंत सिंह यांच्याकडे सुमारे ३७.८८ कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. यामध्ये २६.६६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ११.२२ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी नीलम देवी यांच्या नावावर सुमारे ६२.७२ कोटी रुपयांची संपत्ती घोषित करण्यात आली आहे. अनंत सिंह यांच्याकडे लक्झरी गाड्यांचेही मोठे कलेक्शन आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर तीन महागड्या SUV गाड्यांची नोंद आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
२०२५ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, अनंत सिंह यांच्यावर खून (हत्या), खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायदा (Arms Act) आणि चोरी यांसारख्या गंभीर कलमांखाली २८ आपराधिक खटले प्रलंबित असल्याचे अधिकृतरीत्या नमूद केले होते. दुसरीकडे, नोव्हेंबर २०२६ मध्ये दुलारचंद यादव हत्याकांडातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात सुमारे ६७ गुन्हे आहेत. अनंत सिंह यांनी स्वतः २०१४ मधील एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्यावर एकेकाळी १५० हून अधिक खटले दाखल होते.