तिरुमला : रिलायन्स इंडस्ट्रिजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी यांनी आज (२८ जून) पहाटे आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानाला भेट देऊन भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी मंदिराच्या परंपरेनुसार आपले पूर्ण केस कापून देवाच्या चरणी अर्पण (केशदान) केले. तसेच तिरुपती देवस्थानला रिलायन्सकडून २५ अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस देणगी म्हणून दिल्या.
गेल्या अनेक वर्षांपासूनची ओळख असलेले केस केले दान
आज तिरुमला येथे अनंत अंबानी यांच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बालाजीचे भक्त असलेल्या अनंत यांनी येथील परंपरा पाळल्या त्यांनी गेली अनेक वर्ष असलेली ओळख असलेले केस त्यांनी दान केले. अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग घेत असताना अनंत यांचे केस लक्ष वेधू घेत होते आज त्यांनी बालाजी चरणी केस अर्पण करुन मुंडण करुन घेतले आहे.
आपल्या तीर्थयात्रेचा एक भाग म्हणून, अनंत यांनी भगवान व्यंकटेश्वरांना आपले केस अर्पण केले. तिरुमला येथील ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा असून, भक्त या कृतीकडे शरणागती आणि नम्रतेचे प्रतीक म्हणून पाहतात; तसेच हे अहंकार आणि सांसारिक मोह त्यागाचेही प्रतीक मानले जाते. श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मंदिरात दररोज हजारो भाविक आपले केस अर्पण करतात.
पहाटेच्या सुप्रभातम सेवेत सहभाग
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानी यांनी रविवारी पहाटे मंदिरात होणाऱ्या पवित्र 'सुप्रभातम सेवे'मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी मुख्य गाभाऱ्यात जाऊन बालाजीचे दर्शन घेतले आणि विशेष पूजा-अर्चा केली. दर्शन झाल्यानंतर त्यांनी मंदिराच्या शतकानुशतके चालत आलेल्या प्रथेचे पालन करत केशदान (मुंडण) केले. केस दान केल्यानंतर अनंत अंबानी हे पांढरी धोती आणि उपरणे अशा अत्यंत साध्या, पारंपरिक दक्षिण भारतीय पेहरावात पाहायला मिळाले.
२७.५ कोटी रुपयांची मोठी देणगी
या धार्मिक भेटीचे औचित्य साधत अनंत अंबानी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ट्रस्टला तब्बल २७.५ कोटी रुपये किमतीच्या २५ इलेक्ट्रिक बसेस (EV Buses) देणगी म्हणून दिल्या. तिरुमला पर्वतावर पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठी ही मदत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या बसेस चालवण्यासाठी लागणाऱ्या ५० ड्रायव्हर्सचा पगार आणि इतर खर्च रिलायन्स कंपनी स्वतः उचलणार असून देवस्थान परिसरात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासही सहकार्य करणार आहे.
दरम्यान, अनंत अंबानी यांचा हा मुंडण केलेला नवीन आणि अत्यंत साधा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यांच्या या धार्मिक वृत्तीचे आणि नम्रतेचे नेटकऱ्यांकडून मोठे कौतुक केले जात आहे.