पुढारी ऑनलाईन डेस्क : Anant Ambani and Radhika Merchant Wedding : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चट शुक्रवारी (12 जुलै) विवाहबंधनात अडकणार आहेत. हा विवाहसोहळा मुंबईतील वांद्रे कुर्ला सेंटर (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी देश-विदेशातील राजकीय व्यक्ती, औद्योगिक, बॉलीवूड, हॉलीवूड कलाकार, क्रीडा यांच्यासह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची तपशीलवार यादी शेअर केली आहे. रिॲलिटी शो स्टार किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन या लग्नाला पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्युच्युरिस्ट पीटर डायमंडिस, कलाकार जेफ कून्स आणि सेल्फ हेल्प कोच जय शेट्टी हे देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि टोनी ब्लेअर, अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी, माजी स्वीडनचे पंतप्रधान कार्ल बिल्ड आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर हेही या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चट यांचा नुकताच हळदी सोहळा आणि मेहंदी सोहळा पार पडला. दरम्यान लग्नसोहळ्यानिमित्त जेवणात पाहुण्यांसाठी तब्बल अडीच हजार विविध पदार्थ ठेवण्यात येणार आहेत. लग्नासाठी पाहुण्यांना पारंपारिक ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.
पाहुण्यांच्या यादीत टांझानियाचे राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन, आयओसीचे उपाध्यक्ष जुआन अँटोनियो समरांच, डब्ल्यूटीओचे महासंचालक न्गोझी ओकोन्जो-इवेला आणि फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांचाही समावेश असेल. एचएसबीसी समुहाचे अध्यक्ष मार्क टकर, आरामकोचे सीईओ अमीन नासेर, मॉर्गन स्टॅनलेचे एमडी मायकेल ग्रिम्स, ॲडोबचे सीईओ शंतनू नारायण, मुबाडालाचे एमडी खालदून अल मुबारक, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष जे ली, लॉकहीड मार्टिनचे सीईओ जेम्स टॅकलेट, बीपीचे सीईओ मरे ऑचिनक्लोस, टेमासेकचे सीईओ दिलहान पिल्ले आणि एरिक्सनचे सीईओ बोर्जे एकहोल्म यांच्यासह अनेक व्यावसायिकही या कार्यक्रमाचा भाग बनणार आहेत.
HP चे अध्यक्ष एनरिक लोरेस, ADIA बोर्ड सदस्य खलील मोहम्मद शरीफ फौलाथी, कुवेत गुंतवणूक प्राधिकरणाचे MD बद्र मोहम्मद अल-साद, नोकिया चेअरमन टॉमी उइटो, ग्लॅक्सोस्मिथक्लाईनच्या सीईओ एम्मा वाल्म्सली, जीआयसी सीईओ लिम चाव कियाट आणि Moelis & Co. चे उपाध्यक्ष एरिक कँटर यांच्यासह केंद्रीय कॅबिनेट मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर उद्योगपती देखील विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवतील.