राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी अमृत उद्यानाच्या हिवाळी आवृत्तीचे उद्घाटन केले आणि उद्यानात फेरफटका मारला. Pudhari Photo
राष्ट्रीय

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान सर्वसामान्यांसाठी झाले खुले !

Rashtrapati Bhavan Garden| उद्यान २ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२५ या कालावधीत जनतेसाठी खुले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान रविवारपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी अमृत उद्यानाच्या हिवाळी आवृत्तीचे उद्घाटन केले आणि उद्यानात फेरफटका मारला. अमृत उद्यान २ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२५ पर्यंत जनतेसाठी खुले राहील. दरम्यान, राष्ट्रपती भवनात ६ ते ९ मार्च दरम्यान 'विविधता का अमृत महोत्सव'आयोजित केला जाणार आहे. या वर्षी अमृत महोत्सवात दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडवले जाणार आहे. दरवर्षी देशभरातील ५ ते ६ लाख लोक अमृत उद्यानाला भेट देत असतात.

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान २ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२५ या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. सोमवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. मात्र उद्यान ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे, २० आणि २१ फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात आयोजित एका परिषदेमुळे आणि १४ मार्चला होळीच्या निमित्ताने बंद राहील. अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट निशुल्क आरक्षित करता येतील. अमृत उद्यानाला भेट देणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक ३५ मधून होईल. अभ्यागतांच्या सोयीसाठी सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशन ते प्रवेशद्वार क्रमांक ३५ दरम्यान शटल बस सेवा दर ३० मिनिटांनी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाव्यतिरिक्त सर्वसामान्य लोक मंगळवार ते रविवार दरम्यान राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयाला देखील आधी तिकीट आरक्षित करून भेट देऊ शकतात.

‘या’ दिवशी विशेष श्रेणींसाठी उद्यान खुले राहील

अमृत उद्यान २६ फेब्रुवारी रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी, तर २७ फेब्रुवारी रोजी संरक्षण, निमलष्करी आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी, २८ मार्च रोजी महिला आणि आदिवासी महिला बचत गटांसाठी आणि २९ मार्च रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले असेल.

अमृत उद्यानात काय काय?

१५ एकरांवर पसरलेल्या या प्रसिद्ध उद्यानात ८५ हून अधिक प्रजातींची फुले आहेत. यात १०० हुन अधिक प्रकारचे गुलाब आणि ५ हजार हंगामी फुलांच्या ७० विविध प्रजाती आहेत. विविध प्रकारच्या ट्यूलिपसह जगभरातील रंगीबेरंगी फुलांची झाडे आहेत. फुलांव्यतिरिक्त १६० जातींची ५ हजार झाडे अमृत उद्यानात आहेत, यातील काही काही झाडे अनेक दशके जुनी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT