'तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही', वंदे मातरम् मुद्द्यावरून अमित शाह यांची सोनिया गांधींवर टीका file photo
राष्ट्रीय

'तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही', वंदे मातरम् मुद्द्यावरून अमित शाह यांची सोनिया गांधींवर टीका

अमित शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासोबत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

पुढारी वृत्तसेवा

amit shah vande mataram congress sonia gandhi controversy

पुढारी ऑनलाईन : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, मतपेढीच्या राजकारणाच्या लालसेपोटी काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ला विसरले होते. त्यांनी सांगितले की, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला पुन्हा एक नवे आयुष्य देण्याचे काम केले आहे.

राजस्थानमधील चित्तौडगड येथे अमित शाह यांनी दावा केला की, काँग्रेसच्या मुख्यालयात ‘वंदे मातरम्’ गायले जात होते. गान सुरू असताना सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षांना ते गाणे थांबवण्यास सांगितले. सोनिया गांधी यांचे हे पाप देशातील जनता कधीही माफ करणार नाही, असे शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, “८० वर्षांनंतर बंकिम बाबूंच्या या अमर गीताला पुन्हा सन्मान मिळत आहे, हेही सोनिया गांधींना सहन होत नाही.” ते पुढे म्हणाले, “सोनिया जी, १४० कोटी जनता तुम्हाला पाहत आहे. तुम्ही केलेले हे पाप देशातील जनता कधीही माफ करणार नाही.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, ‘वंदे मातरम्’ हे गीत अर्धवट सोडले जावे, असा विचार कोणी स्वप्नातही कसा करू शकतो? काँग्रेसवाल्यांना लाज वाटली पाहिजे. अजून थोडीही लाज शिल्लक असेल, तर दोन्ही हात जोडून बंकिम बाबूंच्या अमर आत्म्याची आणि देशातील जनतेची माफी मागावी.

दरम्यान, रविवारी अमित शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासोबत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

एका जाहीर सभेला संबोधित करताना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली १९९९ मध्ये पोखरण येथे अणुचाचणी झाली आणि त्याच वर्षी भारताने कारगिलचे युद्ध जिंकले. हेच काम पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून भारताला एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर प्रस्थापित केले.

दरम्यान, कर्नाटकातील मंगळुरूमध्ये भाजप नेते विकास पुत्तूर यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरोधात उर्वा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चे गायन मध्येच थांबवण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या पुत्तूर यांनी तत्काळ एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT