पाटणा ः एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी औद्योगिक कॉरिडॉर उभारू इच्छितात, तर दुसरीकडे इंडिया आघाडी घुसखोरांसाठी कॉरिडॉर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सासाराम शहरात एका सभेला संबोधित करताना शहा यांनी हे वक्तव्य केले. ‘भविष्यात पाकिस्तानवर टाकले जाणारे मोर्टार शेल्स याच राज्यातील एका ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार केले जातील,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. शहा यांनी आरोप केला, नुकतीच राहुल गांधी आणि लालूंच्या मुलाने (तेजस्वी यादव) मतदार अधिकार यात्रा काढली. बिहारमधील गरीब, दलित आणि अत्यंत मागासवर्गीय यांच्या जीवनात सुधारणा करणे हा या यात्रेचा उद्देश नव्हता, तर घुसखोरांना संरक्षण देणे हा होता.
ते पुढे म्हणाले की, विरोधकांच्या व्होट बँकेच्या राजकारणामुळे ते घुसखोर कॉरिडॉर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याचे काम करत आहेत. केंद्रात जेव्हा मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि लालू यांचे सरकार होते, तेव्हा दहशतवादी आपल्या भूमीवर सहज हल्ले करत होते. भविष्यात जर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला करण्याची हिंमत केली, तर त्यांच्या गोळ्यांना मोर्टार शेल्सने प्रत्युत्तर दिले जाईल आणि तुम्हाला माहीत आहे का, हे मोर्टार शेल्स कुठे तयार होतील? बिहारमध्ये, सासाराममध्ये. कारण, मोदी येथे संरक्षण कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गृहमंत्री शहा म्हणाले.