नवी दिल्ली : ‘मी संसदेत केलेले वक्तव्य हे संसदेच्या रेकॉर्डवर आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रश्नच नाही. मी किंवा माझा पक्ष स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही, असे स्पष्टीकरण देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
देशाच्या लोकशाहीची मूळे मजबूत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोठे आहे, असेही शाह म्हणाले. बुधवारी काँग्रेसने अमित शाह यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याबाबत राजीनाम्याची मागणी केली. यावर उत्तर देत काँग्रेस पक्षच मुळी संविधान विरोधी आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान काँग्रेसनेच केला, असे म्हणत अमित शाह यांनी आपली बाजू मांडली. दरम्यान, काँग्रेसद्वारे केल्या जाणाऱ्या कृत्यांवर संसदेच्या आत आणि बाहेर काय कायदेशीर कारवाई करता येईल, यावरही विचार करणार असल्याचे शाह म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संसदीय कार्यमंत्री किरेण रिजिजू, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, उपस्थित होते. पक्ष मुख्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना शाह म्हणाले की, संसदेत संविधानावर चर्चेचे आयोजन केले होते. यामध्ये ७५ वर्षातील देशाची गौरवयात्रा आणि उपलब्धता यावरही चर्चा झाली. संसदेत चर्चा करताना गोष्टी तथ्य आणि सत्यावर आधारित झाल्या पाहिजेत. मात्र काँग्रेस पक्षाने कालपासून तोडून फोडून गोष्टी दाखवायला सुरुवात केली, याचा मी निषेध करतो. भाजपाच्या वक्त्यांनी संविधानावर, संविधानाच्या मूल्यावर तसेच जेव्हा जेव्हा भाजपची सत्ता देशात आणि राज्यात राहिली त्यावेळी संवैधानिक मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन कसे करण्यात आले, याबाबत विविध उदाहरणांवसह चांगली भाषणे केली. यात हे सिद्ध झाले की काँग्रेस पक्ष आंबेडकर विरोधी आहे, आरक्षण विरोधी आहे, संविधान विरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने सावरकरांचा अपमान केला तसेच देशात आणीबाणी लागू करून संवैधानिक मूल्यांना तिलांजली दिली, महिला सन्मानाला अनेक वर्ष दुर्लक्षित ठेवले, न्यायव्यवस्थेचा कायम काँग्रेसने अपमान केला, देशातील शहिदांचाही काँग्रेसने अपमान केला, देशाचा काही भाग तोडून विदेशाला देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. हे सत्य समोर असताना काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जुन्याच पद्धतीने सत्य गोष्टींची तोडफोड करत असत्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला भरकट होण्याचा प्रयत्न केला.
अमित शाह म्हणाले की, संसदेत जेव्हा चर्चा सुरू होती, तेव्हा हे सिद्ध झाले की काँग्रेसने कशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला, स्वातंत्र्यांनंतर पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्वतःला भारतरत्न दिले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही भारतरत्न उशिरा देण्यात आला, तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत नव्हता. १९९० पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळू नये, यासाठी काँग्रेसने कायम प्रयत्न केले. नेहरूंच्या काळात जाणीवपूर्वक आंबेडकरांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. बाबासाहेब आंबेडकरांची शंभरावी जयंती साजरी करण्यासाठीही आणि बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बनवण्यासही काँग्रेसने नकार दिला. मात्र गांधी-नेहरू परिवाराने स्वतःच्या कुटुंबातील लोकांचे अनेक स्मारक देशभरात बनवले. जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत राहिला तेव्हा कुठलेही मोठे स्मारक बनले नाहीत. याउलट जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकारे आली तिथे चांगले स्मारक बनले. भाजपच्या सरकारमध्ये विशेषकरून नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये बाबासाहेबांशी संबंधित स्मारकांचा विकास करण्यात आला. यावेळी महू येथील त्यांचे जन्मस्थळ, लंडनमधील घर, नागपूरातील दीक्षाभूमी, दिल्लीतील महापरिनिर्वाण स्थान, मुंबईतील चैत्यभूमीचा विकास भाजप सरकारने केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ देशात संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली, दिल्लीत आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरची स्थापना करण्यात आली, असेही शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, राज्यसभेतील माझ्या भाषणाला तोडूनमोडून दाखवण्यात येत आहे. यापूर्वीही निवडणुकीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून माझी चुकीची भाषणे पसरवण्यात आली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीतही असेच केले. दरम्यान माझे संसदेतील भाषण रेकॉर्डवर आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वत्र पोहोचवले आहे. माध्यमांनीही ते सर्वत्र पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच मी त्या पक्षातून येतो जो पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायम सन्मान करत आलेला आहे. आधी जनसंघ आणि नंतर भाजपने कायम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतावर चालण्याचे काम केले आहे. काँग्रेसमध्ये मात्र इंदिरा गांधींनी मंडल आयोगाकडे दुर्लक्ष केले होते. राजीव गांधींनी आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठे भाषण ओबीसींना विरोध करण्यासाठी दिले.
अमित शाह म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे हे त्या वर्गातून येतात ज्या वर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यामुळे किमान त्यांनी काँग्रेसच्या चुकीच्या प्रयत्नांचा भाग होऊ नये. मला दुःख वाटते की मल्लिकार्जुन खर्गे देखील राहुल गांधींच्या दबावाला बळी पडून या प्रयत्नांमध्ये सामील होतात. खर्गे माझा राजीनामा मागत आहेत. मात्र त्यामुळे त्यांच्या समस्येचे समाधान होणार नाही. त्यांना आणखी किमान १५ वर्ष विरोधी पक्षात बसायचे आहे. राहुल गांधींनी दाखवलेली संविधानाचे पुस्तक कोरे होते, त्यामुळे त्यांचे संविधान प्रेम किती बेगडी आहे हे दिसून येते असे म्हणत टीकाही केली.