दिल्ली येथे बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. pudhari photo
राष्ट्रीय

महाराष्ट्र, गुजरात हे देशासह जागतिक पटलावर नाव चमकणारे राज्य : अमित शाह

राजधानी दिल्लीत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस साजरा

पुढारी वृत्तसेवा

Amit Shah on Maharashtra and Gujarat

नवी दिल्ली : भारताला समृद्ध करणारे, भारताचे नाव जागतिक पटलावर आणण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा स्थापना दिवस आहे. या दोन्ही राज्यांचा हा प्रवास असाच उत्तरोत्तर सुरू राहावा, अशा शुभेच्छा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या.

राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अमित शाह बोलत होते.

या कार्यक्रमाला न्यायाधीश प्रसन्न वराळे, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया, दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला तसेच महाराष्ट्र आणि गुजरातचे दिल्लीस्थित नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आर. विमला यांनी अमित शाह, रेखा गुप्ता, विनय कुमार सक्सेना यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, गुजरात आणि महाराष्ट्र यांनी, कोणताही वाद न घालता स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत आणि चांगल्या स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. पंतप्रधान मोदींनी "एक भारत, श्रेष्ठ भारत" या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून आज विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देत आहेत.

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. अनेक वीर पराक्रमी लोकांची भूमी आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले.

अमित शाह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज महाराष्ट्रात गरबा तर गुजरातमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. ही परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण भारताची खरी ताकद आहे. या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत. २०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेल, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT