कोलकाता; वृत्तसंस्था : पुढील 15 दिवस मी बंगालमध्ये राहणार आहे. तृणमूल काँग्रेसला मुळासकट उपटून बंगालच्या उपसागरात फेकून द्या, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी केले. शहा यांची कोलकातामध्ये सभा झाली. यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांनी भवानीपूर येथे भव्य रोड शो केला.
ममता बॅनर्जी यांचे निवासस्थान असलेल्या कालीघाट परिसरात जेव्हा अमित शहांचा रोड शो आला, तेव्हा तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अमित शहांना काळे झेंडे दाखवत ‘जय बांग्ला’ आणि ‘ममता बॅनर्जी जिंदाबाद’, ‘अमित शाह गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. येथे भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि किरकोळ झटापटीचे प्रकार घडले. पोलिसांनी तत्काळ बॅरिकेडिंग करून गर्दीवर नियंत्रण मिळवले.
कोलकाता येथील सभेत बोलताना अमित शहा म्हणाले, सुवेंदू अधिकारी हे फक्त नंदीग्राममधून निवडणूक लढवू इच्छित होते; मात्र ममतांना त्यांच्या घरातच पराभूत करणे आवश्यक आहे, असे मी त्यांना सांगितले. ममता बॅनर्जी या भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात दोन्ही ठिकाणी सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांपैकी 23 एप्रिल रोजी 152 मतदारसंघांत आणि 29 एप्रिल रोजी 142 मतदारसंघांत मतदान होईल. निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहे.
तृणमूलने सोशल मीडियातून, बंगालमध्ये पर्यटकांचे स्वागत आहे, असा टोला शहा यांना लगावला आहे. बंगालमधील प्रसिद्ध मुरी घोंटो, पाब्दा माछेर झोल, इलिश भापा, चिंग्री मलाई करी, भेतकी पातुरी आणि कोशा मंग्शो हे मांसाहारी पदार्थ चाखण्याचा सल्लाही पोस्टमधून दिला आहे. दरम्यान, मालदा येथे एसआयआर प्रक्रियेत सहभागी सात न्यायिक अधिकार्यांचे संरक्षण करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरला आहे. अधिकार्यांच्या मोठ्या प्रमाणातील बदल्यांमागे अमित शहा यांचा हात आहे.