मुझफ्फरपूर; (पीटीआय) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राजद प्रमुख लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांचा मुलगा सत्तेवर आल्यास बिहारमध्ये ‘हत्या, अपहरण आणि खंडणीसाठी तीन मंत्रालये तयार होतील,’ असा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, एनडीए पुन्हा सत्तेत आल्यास बिहारला पूरमुक्त केले जाईल, असा दावा त्यांनी मुझफ्फरपूरमधील सभेला संबोधित करताना केला. यावेळी ते म्हणाले की, राजदच्या राजवटीत अनुभवलेल्या जंगलराजची पुनरावृत्ती रोखण्यासाठी ‘जनतेने एनडीएला मत द्यावे. एनडीए केवळ विकासाचे नवे पर्व सुरू करणार नाही, तर पूर नियंत्रणासाठी स्वतंत्र मंत्रालयही तयार करेल.’ जर लालूंचा मुलगा (तेजस्वी) बिहारचा मुख्यमंत्री झाला, तर अपहरण, खंडणी आणि हत्येवर देखरेख ठेवण्यासाठी आणखी तीन नवीन मंत्रालये तयार केली जातील... तुमची एनडीएला दिलेली मते बिहारला राजदच्या जंगलराजपासून वाचवतील.