Amit Shah assurance | नाराजीनाट्यावर पडदा! तुमचा योग्य सन्मान राखला जाईल  
राष्ट्रीय

Amit Shah assurance | नाराजीनाट्यावर पडदा! तुमचा योग्य सन्मान राखला जाईल

अमित शहा यांचे एकनाथ शिंदेंना आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत सुरू झालेल्या पक्षफोडीला विराम देण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी यशस्वी ठरली आहे. या फोडाफोडीतून अवमानित करणारी परिस्थिती उद्भवणार नाही, अशीही खात्री शिंदे यांनी या दिल्ली भेटीत मिळवली. ‘तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल,’ अशा शब्दांत केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे यांना आश्वस्त केल्याचेउच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बिहारला जाण्यापूर्वी दिल्लीत थांबा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीचा तपशील शिंदे यांनी शहांच्या कानी घातला व खासकरून आपले चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचेच नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कसे फोडले याची इत्थंभूत कहाणी शहांना कथन केली. यासंदर्भातील सविस्तर वृत्त दै. ‘पुढारी’ने गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध केले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे गुरुवारी बिहारात नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा आटोपून परतल्यानंतर त्यांच्या शहांसोबत झालेल्या चर्चेचा आणखी तपशील हाती आला.

अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचे फोडाफोडीबद्दलचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. माझे महाराष्ट्रावर बारीक लक्ष आहे, असे सूचित करतानाच शहा यांनी शिंदे यांना सांगितले की, ‘तुम्ही ‘एनडीए’चे नैसर्गिक सहकारी आहात, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल.’ अमित शहा यांनी शिंदेंना असे आश्वस्त केल्यानंतरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निमित्ताने महायुतीत आणि त्यातही शिवसेना-भाजपमध्ये फोडाफोडीवरून सुरू झालेल्या कुरबुरींना तूर्त विराम मिळाला आहे. शिंदे यांच्या दिल्ली दौर्‍यानंतर अमित शहा यांनी सूत्रे फिरवली व महाराष्ट्रातील संबंधित कारभार्‍यांना आवश्यक सूचना केल्याचे समजते. परिणामी, पुढील काही दिवसांत इकडून तिकडे होणारे प्रवेश किंवा तत्सम घडामोडींनाही फुलस्टॉप मिळाला.

शिंदेंची नाराजी नाही : बावनकुळे

दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीतील भेट ही महायुतीच्या विजयासाठीची रणनीती आणि प्रशासनिक समन्वयासाठी झाली. नाराजीच्या बातम्या कपोकल्पित असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे स्पष्ट केले.

बावनकुळे म्हणाले, मी स्वतः दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटलो. ते कुठेही नाराज नव्हते. ‘एनडीए’मध्ये नियमितपणे नेते एकमेकांना भेटत असतात.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पक्षांतराविषयी ते म्हणाले, समन्वय समितीने एकमेकांच्या पक्षातील प्रवेश टाळण्याचे ठरवले असले, तरी उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्ते पक्ष बदलतात. माझ्या कामठी मतदारसंघातही असेच झाले. त्यामुळे महायुतीत कुठलीही गडबड नाही.

डोंबिवलीतील पक्ष प्रवेशावर बोलताना बावनकुळे म्हणाले, उमेदवारी न मिळाल्यानंतर कार्यकर्ते हालचाल करतात. याबाबतीत एकनाथ शिंदे शहांकडे जाण्याची शक्यता नाही. तक्रारी असल्यास ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही तर माझ्याकडे येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT