राष्ट्रीय

बिहारमध्ये उष्णतेची लाट; १८ विद्यार्थिनी झाल्या बेशुद्ध, रुग्णालयात केले दाखल

निलेश पोतदार

बेगुसराय (बिहार) ; पुढारी ऑनलाईन देशभरातील अनेक भागात तीव्र उष्‍णता जाणवत आहे. ४५ डिग्री सेल्‍सियसपर्यंत तापमान पोहोचले आहे. दिल्‍लीमध्ये तापमान ५० डिग्री पर्यंत पोहोचले आहे. वाढत्‍या तापमानाने गेल्‍या १०० वर्षातील रेकॉर्ड तोडले आहे. या शिवाय राजस्‍थान, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्‍तर प्रदेश आणि बिहार या राज्‍यांमध्ये भीषण उन्हामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक राज्‍यांमध्ये शाळांना उन्हाळ्याची सुट्टी देण्यात आली आहे, मात्र बिहारमध्ये शाळा अजुनही सुरू आहेत. आज (बुधवार) बिहारच्या बेगूसरायमध्ये तीव्र उष्‍णतेत शाळेत अभ्‍यास सुरू असताना अचानक अनेक विद्यार्थीनी चक्‍कर येउन बेशुद्ध पडल्‍या.

वास्तविक, मटिहाणी ब्लॉकच्या मटिहाणी मिडल स्कूलमध्ये उष्णतेमुळे सुमारे 18 विद्यार्थिनी बेशुद्ध झाल्या, त्यांना उपचारासाठी मटिहाणी रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ज्‍या ठिकाणी सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू आहेत. बेगुसरायमध्ये तापमान ४० डिग्रीवर पोहोचले आहे. अशा वाढलेल्‍या तापमानातही या ठिकाणी शाळा सुरू आहेत.

विद्यालयातील मटिहाणी मध्ये १० वाजण्याच्या सुमारास अचानक विद्यार्थीनी बेशुद्ध पडू लागल्‍या. यानंतर प्राध्यापक चंद्रकांत सिंह यांनी विद्यार्थीनींना ORS पाण्यात घालून दिले. मात्र यानंतरही अनेक विद्यार्थीनी बेशुद्ध होवून पडल्‍या. यानंतर सर्व विद्यार्थींनींना उपचारांसाठी मटिहाणी रेफरल रूग्‍णालयात दाखल करण्यात आले.

मुलींची तब्‍येत बिघडल्‍याचे समजताच पालकांनी रूग्‍णालयाकडे धाव घेतली. त्‍यामुळे १० वाजता मध्यान्ह भोजनानंतर महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली. दरम्‍यान विद्यार्थीनींवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगितले की, उष्‍णतेमुळे मुली बेशुद्ध पडल्‍या आहेत. सध्या त्‍यांना ग्‍लूकोज आणि ओआरएस देण्यात येत असून, त्‍यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT