नवी दिल्ली : अमेरिकेने ३ भारतीय अणुऊर्जा संस्थांवरील २० वर्षांपासून असलेली बंदी उठवली आहे. यामध्ये भाभा अणु संशोधन केंद्र, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र आणि इंडियन रेअर अर्थ या आण्विक संस्थांचा समावेश आहे. भारतातील संस्थांवरील बंदी उठवत असताना चिनच्या ११ संस्थांवर मात्र अमेरिकेने बंदी घातली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर होते. त्यांच्या भारत दौऱ्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला. सुलिव्हन यांनी आयआयटी दिल्ली येथे बोलताना ‘भारतीय अणुऊर्जा प्रकल्प आणि अमेरिकन कंपन्यांमधील सहकार्यात अडथळा आणणारे नियम अमेरिका काढून टाकेल,’ असे म्हणत याचे संकेत दिले होते.
भारताने मे १९९८ मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचण्या केल्या होत्या. या चाचण्यांमुळे अनेक देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लावले. अमेरिकेनेही २०० हून अधिक भारतीय संस्थांवर निर्बंध लावले होते. त्यानंतर मनमोहन सिंह सरकारच्या काळात एक ऐतिहासिक करार झाला होता. मनमोहन सिंह यांनी जुलै २००५ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती. या काळात त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांना अणुकरारासाठी सहमती दर्शवली. मार्च २००६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली. या भेटीदरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला. या करारामुळे जगभरातील अणुबाजार भारतासाठी खुला झाला.