लमा, पेरू : पृथ्वीचे हवामान संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या एका नैसर्गिक प्रणालीला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. पेरूच्या अॅमेझॉन जंगलातील पाम वृक्षांची एक विशाल दलदल, जी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याचे काम करत होती, तिने आता आपली भूमिका बदलली आहे. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ही दलदल आता ‘कार्बन-तटस्थ’ (Carbon Neutral) बनली आहे. या शोधाचे निष्कर्ष वरवर पाहता चिंताजनक वाटत असले तरी, तज्ज्ञांच्या मते यामागील कहाणी अधिक गुंतागुंतीची आहे.
पीट-लँडस् (Peatlands) म्हणजेच दलदलीचे असे प्रदेश, जे कार्बन चक्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पेरूमध्ये या दलदलींनी देशाच्या एकूण भूभागाच्या 5 टक्केपेक्षा कमी क्षेत्र व्यापले आहे, तरीही त्या जमिनीखाली तब्बल 5 गिगाटन कार्बन साठवून ठेवतात. हे प्रमाण पेरूमधील सर्व वनस्पतींमध्ये साठवलेल्या कार्बनइतके आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) मते, जागतिक स्तरावर पीट-लँडस् पृथ्वीच्या केवळ 3 टक्के भूभागावर आहेत; परंतु त्या किमान 550 गिगाटन कार्बन साठवतात. हे प्रमाण जगातील सर्व जंगलांमध्ये साठवलेल्या कार्बनच्या दुप्पट आहे. ‘पृथ्वीवर पीट-लँडस्ने खूपच कमी भूभाग व्यापला असला तरी, कार्बनचा साठा म्हणून त्यांचे महत्त्व प्रचंड आहे,’ असे मिसुरी विद्यापीठाचे जैव-हवामानशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक जेफ्री वूड यांनी सांगितले. या प्रणालींनी हजारो वर्षांपासून अब्जावधी टन कार्बन जमा केला आहे.
जेफ्री वूड आणि त्यांच्या सहकार्यांनी पेरूच्या ‘क्विस्टोकोचा वन अभयारण्या’तील (Quistococha Forest Reserve) अॅमेझॉनच्या प्रमुख पीट-लँड प्रकाराचा अभ्यास केला आहे. स्थानिक पातळीवर ‘अगुआजेल्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या या दलदलीच्या परिसंस्थेत ‘मोरीचे पाम’ वृक्षांचे वर्चस्व आहे. येथील वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात. हा भाग वर्षभर पाण्याखाली असल्याने, वनस्पतींची मृत पाने आणि इतर अवशेष पूर्णपणे कुजत नाहीत. कमी ऑक्सिजनच्या वातावरणात ते ‘पीट’च्या स्वरूपात जमा होतात, ज्यामुळे कार्बन वातावरणात परत जाण्याऐवजी जमिनीतच अडकून राहतो. याच प्रक्रियेमुळे या दलदली ‘कार्बन सिंक’ म्हणजेच कार्बन शोषक म्हणून काम करतात. मात्र, वूड आणि त्यांच्या सहकार्यांच्या अभ्यासात असे दिसून आले की, 2018 आणि 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेणारी ही दलदल 2022 मध्ये मात्र ‘कार्बन-तटस्थ’ बनली. याचा अर्थ, आता ती जेवढा कार्बन शोषते, साधारणपणे तेवढाच उत्सर्जितही करत आहे.