अनिल साक्षी
जम्मू : यंदाच्या अमरनाथ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच यात्रेचे प्रमुख प्रतीक असलेला नैसर्गिक हिमलिंग मोठ्या प्रमाणात वितळल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी हिमलिंग आठ दिवसांनंतर वितळण्यास सुरुवात झाली होती, तर यंदा ही प्रक्रिया अधिक वेगाने झाल्याने पर्यावरणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, यात्रेच्या पहिल्या पाच दिवसांत सुमारे एक लाख भाविकांनी अमरनाथ गुहेचे दर्शन घेतले आहे. तर अनधिकृत अंदाजानुसार हा आकडा दीड लाखांपर्यंत पोहोचला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक गुहेत पोहोचल्यामुळे निर्माण होणारी उष्णता आणि वाढते तापमान यामुळे हिमलिंग जलद गतीने वितळल्याचा दावा पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे.
१९९६ मधील अमरनाथ दुर्घटनेनंतर स्थापन करण्यात आलेल्या नितीन सेनगुप्ता समितीने दरवर्षी जास्तीत जास्त ७५ हजार भाविकांनाच यात्रेची परवानगी द्यावी, अशी शिफारस केली होती. मात्र, ही मर्यादा प्रत्यक्षात कधीच पाळली गेली नसल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदा यात्रेच्या सुरुवातीलाच दीड लाखांहून अधिक भाविक गुहेत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने तैनात असलेले सुरक्षा दल, वाढती गर्दी आणि वातावरणातील उष्णता यामुळे गुहेच्या परिसरातील तापमान वाढत असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तापमान नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्याचा दावा श्राईन बोर्डाने केला असला, तरी हिमलिंग जलद वितळल्यामुळे त्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मात्र, अमरनाथ श्राईन बोर्डाने हिमलिंग वितळण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक असल्याचे सांगत अतिरिक्त गर्दीमुळे त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप फेटाळला आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) हाही एक महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद केले आहे.
पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुहेची क्षमता लक्षात न घेता मोठ्या प्रमाणावर भाविकांना प्रवेश दिला जात असल्याने लाखो लोकांच्या श्वासातून निर्माण होणारी उष्णता हिमलिंगावर परिणाम करत आहे. याशिवाय, यात्रेमुळे डोंगराळ परिसराच्या पर्यावरणालाही मोठा फटका बसत असल्याचा त्यांचा दावा आहे.