CCTV Camera Privacy:
प्रयागराज : शेजाऱ्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होईल, अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.
कोणत्याही व्यक्तीला आपल्या शेजाऱ्याच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याची परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती अजित कुमार आणि न्यायमूर्ती गरिमा प्रसाद यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
याचिकाकर्ते योगेंद्र मौर्य यांनी शेजाऱ्याने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दिशेवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संबंधित कॅमेरा त्यांच्या घरात येण्या-जाण्याच्या मार्गावर केंद्रित असल्याने घरात येणारे पाहुणे आणि कुटुंबीयांच्या खासगीपणाचा भंग होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. हा प्रकार गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचेही त्यांनी याचिकेत नमूद केले होते.
याचिकेवर निकाल देताना, न्यायालयाने याचिकाकर्त्याला या विषयाबाबत संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे औपचारिक अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने असेही आदेश दिले की, जर असा अर्ज दाखल केला गेला, तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यावर विचार करून एका महिन्याच्या आत कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी.