गुवाहाटी; वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आसाममधील एका जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने व्होट बँकेच्या राजकारणासाठी घुसखोरीला प्रोत्साहन दिले, असा आरोप करत त्यांनी भाजप संपूर्ण देशातून घुसखोरांना बाहेर काढेल, असा निर्धार व्यक्त केला.
नागाव जिल्ह्यातील थोर समाजसुधारक श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मभूमी असलेल्या बटाद्रवा थानच्या पुनर्विकसित संकुलाचे उद्घाटन शहांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, भाजपचा संकल्प केवळ आसाममधूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्याचा आहे. हे अवैध स्थलांतरित भारताची सुरक्षा आणि आसामच्या संस्कृतीसाठी मोठा धोका आहेत. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि इतर भागातून सुमारे 1.29 लाख बिघा जमीन घुसखोरांपासून मुक्त केल्याबद्दल शहांनी त्यांचे कौतुक केले. काँग्रेसने 1983 मध्ये कायदा आणून घुसखोरांना कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही त्यांनी केला.
विकासाचे इंजिन बनले आसाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत आसामला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. पूर्वी हे राज्य समस्यांसाठी ओळखले जात होते. पण आज ते ईशान्य भारताच्या विकासाचे इंजिन बनले आहे, असे शहा म्हणाले. तसेच गेल्या काही वर्षांत पाच शांतता करार झाले असून 9,000 तरुणांनी शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात प्रवेश केल्याचेही त्यांनी नमूद केले.