पुढारी ऑनलाईन डेस्क: तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला. यावरून आंध्रप्रदेशसह देशभरात खळबळ उडाली आहे. यावरून आंध्रप्रदेशमध्ये सत्ताधारी आणि माजी सरकारमध्ये वाद देखील पेटला आहे. दरम्यान तिरूपती देवस्थानातील प्रसादाच्या लाडूंची जोरदार चर्चा सुरू आहे. चला जाणून घेऊया ३०० वर्षाचा इतिहास असलेल्या तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादाविषयी...
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, आंध्रप्रदेशातील जगप्रसिद्ध तिरूपती बालाजीच्या मंदीराच्या स्वयंपाकघरात तीनशे वर्षांहून अधिक काळ महाप्रसाद म्हणून तुपातील लाडू तयार केले जातात. अनोखी चव चवी आणि भक्तांचा आवडचा बालाजीचा प्रसाद म्हणून हे लाडू प्रसिद्ध आहेत. हे लाडू भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच तिरूपती बालाजी मंदिराच्या स्वयंपाकघरात म्हणजेच येथील भाषेत 'पोटू' याठिकाणी काळजीपूर्वक तयार केले जातात. हे लाडू विशिष्ट घटक आणि प्रमाण वापरून केलेल्या प्रक्रियेला आंध्रप्रदेशमध्ये दित्तम असे म्हणतात, असे देखील टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
तिरूमला तिरूपती देवस्थान बोर्डच्या अहवालानुसार, तब्बल ३०० वर्षाचा इतिहास असलेल्या तिरूपती बालाजीचा प्रसाद 'लाडू'ची पाककृती फक्त ६ वेळा बदलण्यात आली. २०१६ मध्ये या लाडूत दैवी सुगंध वापण्यात आल्याचे म्हटलं. त्यानंतर हा लाडू तयार करण्यासाठी बेसन आणि गुळाच्या रसापासून बुंदी बनवली गेली. ज्यामागे लाडू खराब होऊ नयेत असा उद्देश होता. नंतर, चव आणि पौष्टिक मूल्य दोन्ही वाढवण्यासाठी बदाम, काजू आणि मनुका जोडले लाडूच्या प्रसादामध्ये समाविष्ट करण्यात आले. दरम्यान खास देशी तुपाचा वापर देखील तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादात केला जात असल्याचे देवस्थान बोर्डच्या अहवालात म्हटले आहे.
TOI च्या वृत्तानुसार, तिरूपती बालाजी देवस्थानच्या स्वयंपाकघरात ३ लाख हून अधिक लाडू तयार होतात. या बालाजी प्रसादाच्या लाडूपासून देवस्थानला एका वर्षात सुमार ५०० कोटी रूपये मिळतात. १७७५ सालापासून देवस्थानकडून प्रसादाचे लाडू तयार केले जातात. २०१४ मध्ये आंध्रप्रदेशातील तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादाला जीआय मानांकन देखील मिळाले होते. या लाडूमध्ये अधिक प्रमाणात गोड, काजू आणि मनुके असतात. एका लाडूचे वजन हे साधारणपणे १७५ ग्रॅम असते.