दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी शिवगाळ करत केला गोळीबार
डोक्यात गोळी लागल्याने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू
जुन्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
Aligarh Muslim University teacher shot dead
अलिगड : उत्तर प्रदेशमधील अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU) परिसरात बुधवारी (दि. २४) रात्री एका संगणक शिक्षकाची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राव दानिश अली (४५) असे त्यांचे नाव आहे. ते माजी आमदाराचे जावई होते. स्कूटीवरून आलेल्या दोन बुरखाधारी हल्खोरांनी हल्ल्यानंतर पळून जाताना हवेत सुमारे १० फेऱ्या झाडल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९च्या सुमारास ग्रंथालयाजवळ गोळीबार झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला मिळाली. राव दानिश अली हे जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दानिश अली हे एबीके बॉईज स्कूलमध्ये संगणक शिक्षक होते. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ते लायब्ररी कँटीन परिसरात आपल्या दोन मित्रांसोबत फिरत होते. यावेळी स्कूटीवरून दोन तोंडाला कापड बांधलेले तरुण तिथे आले. एका हल्खोराने दानिश यांच्या कानशिलाला पिस्तुल लावून विचारले, "आता तरी मला ओळखलंस का मी कोण आहे?". त्यानंतर त्याने शिवीगाळ करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पहिली गोळी लागताच दानिश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांचे मित्र इमरान आणि गोलू यांनी आरडाओरडा केला. याचवेळी हल्खोरांनी दोन पिस्तुलांतून १० राउंड फायरिंग केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने दानिश यांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एसएसपींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एएमयूचे पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले. दानिश यांचे सासरे मोहम्मद उल्ला चौधरी हे मुरादाबादमधील ठाकूरद्वारा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.
दानिश अली यांचे कुटुंब अनेक दशकांपासून अलिगडमध्ये वास्तव्यास आहे. त्यांची आई आणि भाऊ देखील एएमयूमध्ये शिक्षक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्खोरांनी ज्या पद्धतीने संवाद साधला, त्यावरून ते दानिश यांच्या ओळखीचे असावेत असा संशय आहे. जुन्या वादातून ही हत्या झाली असावी. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.