फरिदाबाद : अल-फलाह ट्रस्टने विद्यार्थ्यांची 450 कोटींची फसवणूक करून कोट्यवधी रुपये कुटुंबाशी संबंधित कंपन्यांकडे वळवल्याचा आरोप आहे. बांधकाम आणि केटरिंगची कंत्राटे अध्यक्ष जवाद सिद्दीकी यांच्या पत्नी आणि मुलांच्या मालकीच्या कंपन्यांना देण्यात आली, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अल-फलाह ग्रुपचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना अटक केली. याच ग्रुपच्या फरिदाबाद येथील रुग्णालयात लाल किल्ल्यावरील कार बॉम्बस्फोटामागील आत्मघाती हल्लेखोर आणि या प्रकरणातील इतर आरोपी कामाला होते. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, ही रक्कम फसवणूक, बनावटगिरी आणि बनावट कागदपत्रांच्या वापराद्वारे थेट मिळवण्यात आल्याचा आरोप आहे, जे पीएमएलएअंतर्गत सूचीबद्ध गुन्हे आहेत. न्यायालयाने नमूद केले की, तपास अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे; परंतु कथित आर्थिक गुन्ह्यांना गंभीर म्हटले आहे.
ईडीने सादर केलेल्या विस्तृत आर्थिक विश्लेषणानुसार 2018-19 ते 2024-25 या आर्थिक वर्षांदरम्यान अल-फलाह संस्थांनी शिक्षणातून सुमारे 415.10 कोटी रुपये कमावले. ईडीच्या मते, हा निधी गुन्ह्यातून मिळालेली रक्कम आहे. कारण, ज्या काळात विद्यापीठाने आपली मान्यता आणि वैधानिक दर्जा याबद्दल सार्वजनिकपणे चुकीची माहिती दिली, त्या काळात तो गोळा करण्यात आला होता.