पुढारी ऑनलाईन डेस्क: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव रविवारी (दि.२६) दुपारी अचानक प्रयागराज येथे पोहोचले. यावेळी त्यांचा मुलगा अर्जुन यादव देखील सोबत होते. त्यांनी महाकुंभ मेळ्यात सहभागी होत त्रिवेणी संगमात ११ डुबक्या मारल्या. यानंतर ते महाकुंभमेळा परिसरातील सेक्टर १६ मध्ये पोहोचले, असे वृत्त एएनआयने दिले आहे. आज रविवार महाकुंभ मेळ्याचा १३ वा दिवस आहे. आतापर्यंत १० कोटींहून अधिक भक्तांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव रविवारी दुपारी १२:३० वाजता बामरौली विमानतळावर पोहोचले. त्यांचा मुलगा अर्जुन यादव आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी हेही त्यांच्यासोबत होते. त्रिवेणी संगमातील स्नान झाल्यानंतर समाजवादी नेते आणि माजी मुख्यमंत्र्यांनी मुलायम सिंह यादव यांच्या पुतळ्याला फुले अर्पण करून आशीर्वाद घेतले.
त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव महाकुंभ २०२५ वर बोलताना म्हणाले, "... मी आज महाकुंभात स्नान करून निघत आहे. मी ११ वेळा स्नान केले आहे. आज महाकुंभातून सकारात्मक संदेश गेला पाहिजे. मी एक हरिद्वारमध्ये आधी स्नान केले आणि आज मला संगमात स्नान करण्याची संधी मिळाली आहे. आमचा संकल्प आहे की, "सद्भावना आणि सहिष्णुता कायम राहिली पाहिजे आणि स्नान सहिष्णुतेने केले पाहिजे".
"मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की वृद्ध महिला आणि पुरुष दूरदूरच्या ठिकाणाहून संगमात स्नान करण्यासाठी पायी येतात. लोक महाकुंभाला पायी येत आहेत, पण जर सरकार महाकुंभावर हजारो कोटी रुपये खर्च करत असेल, तर वृद्धांसाठी काही व्यवस्था करायला हवी होती. जेणेकरून त्यांना जास्त चालावे लागू नये...", असे देखील अखिलेश यादव यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.