नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बिहारमध्ये शनिवारी (दि. २५) पुकारलेल्या ‘बिहार बंद’ आंदोलनादरम्यान सिवान जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थ्यांवर थेट एके-४७ रायफलने गोळीबार करणाऱ्या पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस मुख्यालयाने ही कारवाई केली आहे.
राज्यव्यापी बंददरम्यान सिवानसह अनेक जिल्ह्यांत विद्यार्थी संघटनांनी मोठी निदर्शने केली. गांधी मैदानाच्या दिशेने मोर्चा जात असताना पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि परिस्थिती चिघळली. याच दरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याने एके-४७ मधून गोळीबार केल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात जखमी झालेल्या तीनजणांवर पाटणा येथील जयप्रभा मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यामध्ये १५ वर्षीय मोहम्मद आरिफचाही समावेश असून त्याच्या मानेतून शस्त्रक्रियेद्वारे गोळी काढण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाने सरकारवर टीका केली. पोलिस प्रशासनाने याप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
बिहारमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे
पाटणा : ‘नीट-यूजी २०२६’मधील कथित पेपरफुटीप्रकरणी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर नोंदवलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची आणि कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याची घोषणा बिहार सरकारने सोमवारी केली. राज्य सरकारने अटक किंवा ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. ‘बिहार बंद’दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. काहींनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले करत सरकारी गाड्या आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली. या प्रकरणात सुमारे ६९४ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एके-४७ मधून गोळीबार झाल्याच्या बातम्या समोर येत असून शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे केला. देशातील विद्यार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.