Ajit Pawar Plane Crash
नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघाताबाबत संबंधित विमान कंपनी 'व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड'चे संचालक विजय कुमार सिंग यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नसून, खराब हवामानामुळे धावपट्टी न दिसल्याने व वैमानिकाच्या निर्णयामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
सिंग यांच्या माहितीनुसार, विमानाचे लँडिंग करण्याचा निर्णय सर्वस्वी वैमानिकाचा होता. "वैमानिकाने आधी रनवे २९ वरून उतरण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरल्याने त्यांनी 'मिस्ड अप्रोच' घेतला. त्यानंतर पुन्हा रनवे ११ वरून लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिकदृष्ट्या असे दिसते की, वैमानिकाला धावपट्टी नीट दिसत नव्हती. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय ठरला," असे सिंग म्हणाले.
अपघातात प्राण गमावलेल्या वैमानिकांच्या अनुभवाबद्दल बोलताना सिंग भावूक झाले. मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांना १६,००० तासांहून अधिक उड्डाणाचा मोठा अनुभव होता. त्यांनी सहारा, जेटलाईट आणि जेट एअरवेज सारख्या कंपन्यांमध्ये काम केले होते. सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनाही १५०० तासांचा अनुभव होता. विमान देखील तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सुस्थितीत होते. देखभालीमध्ये कोणतीही उणीव नव्हती किंवा उड्डाणादरम्यान कोणताही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
"कॅप्टन सुमित कपूर माझ्यासाठी भावासारखे होते, तर कॅप्टन शांभवी पाठक माझ्या मुलीसारखी होती. हे दोन्ही उत्कृष्ट वैमानिक होते. सध्या आमचे प्राधान्य मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आहे," असे विजय कुमार सिंग म्हणाले.
२०२३ मध्ये मुंबई विमानतळावर झालेल्या अपघाताबाबत विचारले असता सिंग म्हणाले की, "त्यावेळीही मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता कारणीभूत होती. लँडिंगनंतर धावपट्टीवरून विमान घसरल्याने तो अपघात झाला होता."
या भीषण अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला असून, लँडिंगच्या वेळी धावपट्टी शोधण्यात वैमानिकांना आलेल्या अडचणींमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात होण्यापूर्वी वैमानिकांनी कोणताही धोक्याचा किंवा आणीबाणीचा (Mayday) संदेश दिला नव्हता.
DGCA च्या माहितीनुसार, सकाळी ८:१८ वाजता विमानाचा बारामती एअरफील्डशी संपर्क झाला होता. ८:४३ वाजता विमानाला लँडिंगसाठी क्लिअरन्स देण्यात आला. मात्र, तत्पूर्वी धावपट्टी ११ वर उतरताना वैमानिकांना धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. त्यामुळे त्यांनी विमान पुन्हा हवेत झेपावले. दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करतानाही सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याचे वैमानिकांनी सांगितले, पण काही सेकंदातच 'धावपट्टी दिसत आहे' असा संदेश दिला. लँडिंगची परवानगी मिळाल्यावर वैमानिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला आग लागल्याचे निदर्शनास आले.