राष्ट्रीय

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल, महाराष्ट्र नव्हे 'या' राज्यात FIR

महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याने रोहित पवार यांनी परराज्यातील पोलिसांत धाव घेतली.

पुढारी वृत्तसेवा

बेंगळुरू : महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेला विमान अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड नसून, त्यामागे एक मोठा राजकीय आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. अजित पवार यांचे पुतणे आणि व्यावसायिक रोहित राजेंद्र पवार यांनी या प्रकरणी कर्नाटकच्या बेंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात 'झिरो एफआयआर' (Zero-0001/2026) दाखल केला आहे. महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याने रोहित पवार यांनी बेंगळुरू पोलिसांत धाव घेतली आहे.

अपघाताची पार्श्वभूमी आणि जीवितहानी

२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास 'व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या मालकीचे बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ (VT-SSK) हे विमान मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळाजवळ उतरत असताना सकाळी ८:४३ ते ८:४५ च्या दरम्यान हे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मुख्य वैमानिक सुमित कपूर, सह-वैमानिक शाम्भवी पाठक, एअरलाईन्स कर्मचारी पिंकी माळी आणि सुरक्षा अधिकारी विदीप जाधव अशा पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

विमानाच्या देखभालीत गंभीर त्रुटी आणि फसवणूक

तक्रारीनुसार, ज्या विमानाचा वापर उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी करण्यात आला, ते तांत्रिकदृष्ट्या उड्डाणासाठी सुरक्षित नव्हते. या विमानाने प्रत्यक्ष ८,००० पेक्षा जास्त उड्डाण तास पूर्ण केले होते, जे त्याच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त होते. मात्र, कंपनीने कागदोपत्री केवळ ४,९१५ तास दाखवून विमानाची खरी स्थिती लपवून ठेवली आणि रेकॉर्डमध्ये फेरफार केला, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, डीजीसीएने (DGCA) विमानाची नोंदणी करण्यापूर्वीच त्याचे एअरवर्थिनेस सर्टिफिकेट जारी केले होते, जे नियमांचे उघड उल्लंघन आहे.

झिरो एफआयआरची PDF प्रत

Zero FIR (1).pdf
Preview

वैमानिकाची संशयास्पद भूमिका आणि पार्श्वभूमी

मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्या निवडीवरही या एफआयआरमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सुमित कपूर यांची यापूर्वी दोनदा मद्यप्राशन करून विमान चालवल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाली होती. तरीही त्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या अतिमहत्त्वाच्या (VVIP) उड्डाणाची जबाबदारी देण्यात आली. विशेष म्हणजे, या उड्डाणासाठी आधी ठरवलेले वैमानिक शेवटच्या क्षणी 'ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे' सांगून बदलण्यात आले, ज्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. तसेच, कंपनीने या वैमानिकाचा नुकताच आयुर्विमा उतरवला होता, जो एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकतो, असा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे.

कमी दृश्यमानता आणि लँडिंगचा चुकीचा निर्णय

अपघाताच्या दिवशी बारामती परिसरात दाट धुके होते आणि दृश्यमानता (Visibility) केवळ २,००० ते ३,००० मीटर होती. नियमानुसार ५ किलोमीटरपेक्षा कमी दृश्यमानता असताना लँडिंगला परवानगी नसते, तरीही या विमानाला लँडिंगची मुभा देण्यात आली. वैमानिकाने सुरक्षित धावपट्टीऐवजी धोकादायक समजल्या जाणाऱ्या 'टेबलटॉप' धावपट्टीची निवड केली आणि विमानाची स्थिती हाताबाहेर गेलेली असतानाही कोणताही आणीबाणीचा संदेश (Distress Call) दिला नाही. विमानातील शेवटच्या संवादात सह-वैमानिक शाम्भवी पाठक 'ओ शिट, ओ शिट' असे ओरडताना ऐकू येतात, मात्र मुख्य वैमानिक पूर्णपणे शांत होता, जे संशयास्पद आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे.

पुढील कायदेशीर कारवाई

रोहित पवार यांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६१, १०३, १०५, १०६, १२५, २३८ आणि ३३६(२) अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. बेंगळुरू पोलिसांनी हा 'झिरो एफआयआर' नोंदवून पुढील तपासासाठी तो बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी पलीकडे जाऊन फौजदारी तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT