अजित डोवाल 
राष्ट्रीय

Ajit Doval | सीमा सुरक्षा, अर्थव्यवस्थेसह प्रत्येक बाबतीत भारताला पुन्हा मजबूत करायचे : अजित डोवाल यांचे युवकांना आवाहन 

'पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मजबूत', 'युद्ध शत्रूचे मनोधैर्य खच्चीकरणासाठी लढले जाते' : विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'चे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : हल्ल्यांच्या आणि गुलामगिरीच्या वेदनादायक इतिहासाचा 'बदला' घेण्यासाठी आपला देश केवळ सीमेवरच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या आणि इतर सर्वच बाबतीत मजबूत झाला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी शनिवार केले. दिल्लीत आयोजित 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'च्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा उल्लेख केला. तसेच पंतप्रधान नरेंद मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. 

तुम्ही भाग्यवान आहात की तुमचा जन्म स्वतंत्र भारतात झाला. माझा जन्म पारतंत्र्यातील भारतात झाला होता. आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि अनेक संकटे व अडचणींचा सामना केला, असे ८१ वर्षीय डोवाल यांनी देशभरातील ३,००० युवकांना संबोधित करताना सांगितले. भगतसिंग यांच्यासारख्या लोकांना फाशी देण्यात आली, सुभाषचंद्र बोस यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून महात्मा गांधींना सत्याग्रह करावा लागला, असे ते म्हणाले. बदला हा चांगला शब्द नाही, पण तो एक मोठी शक्ती ठरू शकतो. आपल्याला आपल्या इतिहासाचा बदला घ्यायचा आहे आणि या देशाला अशा टप्प्यावर न्यायचे आहे जिथे तो केवळ सीमा सुरक्षेच्या बाबतीतच नव्हे, तर अर्थव्यवस्था, सामाजिक विकास, प्रत्येक बाबतीत पुन्हा महान होईल, असे ते म्हणाले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मजबूत"

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या युवकांना भविष्यातील नेते संबोधून, डोवाल यांनी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचे अधोरेखित केले, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. नेपोलियन एकदा म्हणाला होता, 'मेंढीच्या नेतृत्वाखालील १,००० सिंहांना मी घाबरत नाही, पण सिंहाच्या नेतृत्वाखालील १,००० मेंढ्यांना मी घाबरतो'. नेतृत्व किती महत्त्वाचे आहे हे यावरून दिसून येते, असे एनएसए म्हणाले. आपण एक प्रगत समाज होतो. आपण इतर संस्कृतीवर किंवा त्यांच्या मंदिरांवर हल्ला केला नाही, परंतु जेव्हा सुरक्षेचा प्रश्न आला तेव्हा आपण जागरूक नव्हतो, त्यामुळे इतिहासाने आपल्याला एक धडा शिकवला. आपण तो धडा शिकलो का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तो धडा आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण जर तरुणांनी तो विसरला, तर ते देशासाठी दुःखद ठरेल, असे ते म्हणाले.

"मृतदेह पाहून आपल्याला आनंद होत नाही"

डोवाल म्हणाले की, जगातील प्रत्येक संघर्ष सुरक्षाविषयक चिंतांमधून जन्माला येतो. संघर्ष का होतात? असे नाही की लोक मनोरुग्ण आहेत आणि त्यांना मृतदेह पाहून आनंद होतो. तर, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि शत्रू राष्ट्राला आपल्या अटी मान्य करायला लावण्यासाठी, शत्रू राष्ट्रांच्या खच्चीकरणासाठी संघर्ष होतात. सध्या जगात कोणताही संघर्ष पाहा, तो सुरक्षेसाठी दुसऱ्या देशावर आपल्या अटी लादण्याबद्दलच आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे, आपल्यालाही स्वतःचे संरक्षण करावे लागेल. ही एक शक्तिशाली भावना आहे; आपण त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

तुमच्यापैकी बहुतेकजण माझ्यापेक्षा किमान ६० वर्षांनी लहान आहात. आणि मी विचार करत होतो की मी तुमच्याशी कोणत्या विषयावर बोलू शकेन. माझे तारुण्य खूप पूर्वीच संपले आहे, तुमचे तारुण्य कशाबद्दल आहे हे देखील मला माहित नाही, असे ते मिश्किलपणे म्हणाले. स्वप्ने जीवन घडवत नाहीत, ती केवळ जीवनाला दिशा देतात आणि ती एका दिवसात पूर्ण होत नाहीत, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला. स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी, तुम्हाला तुमचे निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करावे लागेल. तसेच, प्रेरणा तात्पुरती असते, पण शिस्त चिरस्थायी असते. म्हणून, हार मानू नका, चिकाटी खूप महत्त्वाची आहे. स्वतःवरील विश्वास गमावू नका, असे त्यांनी सांगितले. एनएसए म्हणाले की, तरुणांनी तंत्रज्ञान आणि विज्ञानातील नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शांतपणे नवनवीन शोध लावा आणि यश मिळवा. लक्षात ठेवा की सर्व धाडसी लोक संयमी असतात, सर्व भित्रे अधीर आणि गोंगाट करणारे असतात, असे डोवाल म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT