चेन्नई; वृत्तसंस्था : आकाशात निर्भयपणे झेप घेणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे विमानेही वाऱ्याच्या तीव्र झोतांत स्वतःमध्ये अनुकूल बदल करू शकतात का, या मूलभूत उत्सुकतेतून व विज्ञानाच्या उत्कृष्ट मेळातून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रासच्या वैज्ञानिकांनी नव्या क्रांतीला जन्म दिला आहे. या क्रांतीमुळे येत्या काळात विमान प्रवासाचे चित्र पूर्णपणे बदलून जाईल. पक्ष्यांच्या उड्डाणापासून प्रेरित होऊन विकसित केलेले ‘मॉर्फिंग स्किन’ तंत्रज्ञान विमान क्षेत्रातील सर्वात मोठे व धोकादायक आव्हान असलेल्या ‘एरोडायनामिक स्टॉल’ म्हणजेच वाऱ्याच्या दिशेतील अचानक बदल व विमानाचे संतुलन बिघडण्याच्या धोक्याचा प्रभावी सामना करेल.
विमानांच्या पंखांवरून होणारा हवेचा प्रवाह विलग होऊन विमानाला वर उचलणारी ताकद अचानक संपून हवेचा अडथळा वाढतो. अशावेळी विमान संतुलन गमावून कोसळू लागते. ही गंभीर स्थिती म्हणजेच एरोडायनामिक स्टॉल. या जीवघेण्या समस्येवर तोडगा काढत, आयआयटी मद्रासच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. रिंकू मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने लवचिक रूपांतरित होणारा बाह्य थर तयार केले आहे, जे तत्काळ वाऱ्याच्या प्रवाहानुसार स्वतःचा आकार बदलते. या संशोधनात डॉ. मुखर्जी यांच्यासोबत संस्थेचे माजी विद्यार्थी अँथनी सॅम्युअल बी., डॉ. अरित्रस राय यांनी प्रयोगांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पक्षी कधीही ‘स्टॉल’चे बळी पडत नाहीत. पण त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन बनवलेली विमाने आजही या धोक्याशी झुंजत आहेत. यातूनच आमच्या टीमने मॅक्रो फायबर कंपोझिट पट्ट्यांचा वापर करून निसर्गाच्या याच अनुकूलन क्षमतेला इंजिनिअरिंगमध्ये साकार केले आहे, ज्यांच्याकडे रिअल टाईममध्ये आकार बदलण्याची क्षमता आहे.डॉ. रिंकू मुखर्जी