नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतातील बाह्य वायू प्रदूषणामुळे 2022 मध्ये जवळपास 30 लाख कोटींचा फटका बसला आहे. हे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 9.5 टक्क्यांच्या बरोबरीचे आहे. लॅन्सेट काऊंटडाऊन या आंतरराष्ट्रीय आणि बहु-अनुशासनात्मक संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2022 मध्ये वायू प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या कोव्हिडमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपेक्षा खूप जास्त होती. यावरून परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या जवळच्या समन्वयाने काम करणार्या आरोग्य आणि हवामान बदलावरील लॅन्सेट काऊंटडाऊननुसार, 2022 मध्ये भारतात 2.5 या अतिसूक्ष्म कणरूपी प्रदूषकाच्या संपर्कात आल्याने 17 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मात्र संबंधित मृत्यूंच्या मोठ्या आकड्यांचे खंडन केले आहे.
लॅन्सेटच्या भारतासाठीच्या विशेष अहवालात जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाच्या परिणामावर प्रकाश टाकला आहे. भारतात 2022 मध्ये मानवनिर्मित वायू प्रदूषणामुळे (2.5) 17 लाख 18 हजारहून अधिक मृत्यू झाले, जे 2010 पासून 38 टक्क्यांनी वाढले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.
2022 मध्ये भारतातील घरांमध्ये प्रदूषणकारी इंधनाच्या वापरामुळे होणार्या वायुप्रदूषणामुळे प्रति एक लाख लोकांमागे 113 मृत्यू झाले. घरातील वायुप्रदूषणामुळे होणारे मृत्यू दर शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात जास्त होते (ग्रामीण भागात प्रति एक लाखमागे 125 आणि शहरी भागात 99), असे अहवालात म्हटले आहे.
अहवालानुसार, 2024 मध्ये भारतातील लोकांना सरासरी 19.8 दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. यापैकी 6.6 दिवसांचा सामना हवामान बदलाशिवाय अपेक्षित नव्हता. 1990-1999 च्या तुलनेत, 2024 मध्ये लोकांना सरासरी 366 अधिक तास अशा वातावरणीय उष्णतेचा सामना करावा लागला आहे.