वायुप्रदूषणामुळे 30 लाख कोटींचा फटका 
राष्ट्रीय

Air pollution: वायुप्रदूषणामुळे 30 लाख कोटींचा फटका

2022 मध्ये कोव्हिडच्या मृत्यूपेक्षा दूषित हवेने जादा दगावले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः भारतातील बाह्य वायू प्रदूषणामुळे 2022 मध्ये सुमारे 30 लाख कोटींचा फटका बसला आहे. हे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 9.5 टक्क्यांच्या बरोबरीचे आहे. लॅन्सेट काऊंटडाऊन या आंतरराष्ट्रीय आणि बहुअनुशासनात्मक संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2022 मध्ये वायू प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या कोव्हिडमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपेक्षा खूप जास्त होती.

17 लाख लोकांचा मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेच्या जवळच्या समन्वयाने काम करणार्‍या आरोग्य आणि हवामान बदलावरील लॅन्सेट काऊंटडाऊननुसार, 2022 मध्ये भारतात 2.5 या अतिसूक्ष्म कणरूपी प्रदूषकाच्या संपर्कात आल्याने 17 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मात्र संबंधित मृत्यूंच्या मोठ्या आकड्यांचे खंडन केले आहे.

लाखामागे 113 जणांचा मृत्यू

2022 मध्ये भारतातील घरांमध्ये प्रदूषणकारी इंधनाच्या वापरामुळे होणार्‍या वायुप्रदूषणामुळे प्रति एक लाख लोकांमागे 113 मृत्यू झाले. घरातील वायुप्रदूषणामुळे होणारे मृत्यू दर शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात जास्त होते (ग्रामीण भागात प्रति एक लाखमागे 125 आणि शहरी भागात 99), असे अहवालात म्हटले आहे.

15 वर्षांत मृत्यूच्या प्रमाणात 38 टक्क्यांनी वाढ

लॅन्सेटच्या भारतासाठीच्या विशेष अहवालात जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाच्या परिणामावर प्रकाश टाकला आहे. भारतात 2022 मध्ये मानवनिर्मित वायू प्रदूषणामुळे (2.5) 17 लाख 18 हजारहून अधिक मृत्यू झाले, जे 2010 पासून 38 टक्क्यांनी वाढले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

उष्णतेचा सर्वाधिक त्रास

अहवालानुसार, 2024 मध्ये भारतातील लोकांना सरासरी 19.8 दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. यापैकी 6.6 दिवसांचा सामना हवामान बदलाशिवाय अपेक्षित नव्हता. 1990-1999 च्या तुलनेत, 2024 मध्ये लोकांना सरासरी 366 अधिक तास अशा वातावरणीय उष्णतेचा सामना करावा लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT