अहमदाबाद : लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी (दि.१२) दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर पाचच मिनिटांत कोसळले. या भीषण दुर्घटनेनंतर एअर इंडियाने आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर बदलून काळ्या रंगाचे केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारचे हे विमान (AI171) दुपारी १ वाजून १० मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे झेपावले होते. विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू सदस्य असे एकूण २४२ जण होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमान विमानतळाजवळील मेघानीनगर परिसरात कोसळले. कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे विमान उडवत होते.
एअर इंडियाने ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) एक निवेदन जारी करून या घटनेला दुजोरा दिला आहे. "फ्लाइट AI171, अहमदाबाद-लंडन गॅटविक मार्गावर कार्यरत असताना आज, १२ जून २०२५ रोजी एका दुर्घटनेत सापडले. सध्या आम्ही तपशील गोळा करत असून, अधिक माहिती लवकरात लवकर दिली जाईल," असे या ट्विटमध्ये एअर इंडिया कंपनीने म्हटले आहे. एअर इंडियाच्या इन्स्टाग्रामवरील काळ्या डिस्प्ले पिक्चरवर हेच निवेदन स्टोरी म्हणून टाकण्यात आले आहे.
अपघातानंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली असून, सात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. माध्यमांनी या दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे अनेक व्हिज्युअल्स प्रसिद्ध केले आहेत, ज्यामध्ये एका व्हिडिओमध्ये विमान कोसळताना आणि त्याचा आगीच्या लोळात रूपांतर होताना दिसत आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) माहितीनुसार, गांधीनगरमधून ९० जवानांच्या तीन तुकड्या अपघातस्थळी तैनात करण्यात आल्या आहेत, तर वडोदरामधून आणखी तीन तुकड्या मदतीसाठी पाठवण्यात येत आहेत. या घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.